(रत्नागिरी)
रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे घारपुरेवाडी येथील तरूणाच्या खून खटल्यात शवविच्छेदन करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याचा उलट तपास न्यायालयापुढे होणार आहे. गोळ्या घालून करण्यात आलेल्या या खून प्रकरणात वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष अत्यंत महत्वाची असल्याचे मानले जात आहे. सरकारी पक्षाकडून वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सरतपास घेण्यात आल्यानंतर आता उलटतपासाकडे लक्ष लागून राहिले आहे.
भिकाजी कृष्णा कांबळे (43, रा मारगांबेवाडी, कोतवडे) असे बंदुकीने गोळ्या घालून खून करण्यात आलेल्या तरूणाचे नाव आहे. पोलिसांच्या तपासामध्ये ऋषीकेश विजय सनगरे (21, रा सनगरेवाडी, कोतवडे) यांनेच हा खून केल्याचे उघड झाले होते. त्यानुसार रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी ऋषीकेश याच्याविरूद्ध खूनाचा गुन्हा दाखल करून न्यायालयापुढे दोषारोपपत्र ठेवले. रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल ड़ी बीले यांच्या न्यायालयात हा खटला चालवण्यात येत आहे. सरकारी पक्षाकडून ऍड पुष्पराज शेट्ये न्यायालयापुढे युक्तीवाद करत आहेत.
भिकाजी रंगकाम करणारे ठेकेदार म्हणून कोतवडे गावात परिचित होते. भिकाजी यांच्या मुलीसोबत लग्न करण्याची इच्छा ऋषीकेश याने भिकाजी यांच्याकडे व्यक्त केली. मात्र या लग्नाला भिकाजी यांनी विरोध दर्शवला होता. दिनांक 18 एपिल 2019 रोजी रात्री 8.30 च्या सुमारास भिकाजी कांबळे हे रस्त्याने घरी एकटे जात होते. याचा फायदा गावठी बंदुकीतून भिकाजी त्यांच्या छातीवर गोळी झाडण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने भिकाजी कांबळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. गोळीच्या आवाजाने ग्रामस्थांनी याठिकाणी धाव घेतली. यावेळी भिकाजी हा रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याचे दिसून आले.
या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी अवघ्या 24 तपास खूनाचा छडा लावत ऋषीकेश सनगरे याला ताब्यात घेतले. पोलिसांनी तपास करून न्यायालयापुढे दोषारोपपत्र ठेवले आहे. त्यानुसार सत्र न्यायालयात हा खटला चालविण्यात येत आहे. भिकाजी सनगरे यांच्यावर रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालय येथे शवविच्छेदन करण्यात आले होते. तसेच मृतदेहाचा पंचनामा देखील करण्यात आला होता. शवविच्छेदन अहवालानुसार भिकाजी यांचा मृत्यू हा गोळी लागल्यामुळे झाल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार वैद्यकिय अधिकाऱयांची साक्ष आता अत्यंत महत्वपूर्ण असल्याचे मानले जात आहे. भिकाजी कांबळे यांच्या शरिराच्या कोणत्या भागावर गोळी लागली होती कशा प्रकारची जखम झाली, गोळी किती अंतरावरून मारली, यासंबंधीची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपल्या साक्षीमध्ये नोंदविली आहे. दरम्यान यासंबधी आता बचाव पक्षाकडून उलट तपास घेतला जाणार आहे.
ऋषीकेश हा मुंबई येथे कामाला होता. लग्नाला विरोध केल्याने भिकाजी यांच्याबाबत त्याच्या मनात राग धुमसत होता. गावी आल्यानंतर देखील भिकाजी कांबळे यांच्यासोबत त्याचे खटके उडत होते. भिकाजी कांबळे यांना मारण्यासाठी वापरण्यात आलेले गावठी रिव्हॉलवर त्याने मिळवले होते, असा आरोप ऋषीकेश याच्यावर ठेवण्यात आला आहे.