(रत्नागिरी / प्रतिनिधी)
तालुक्यात मुंबई-गोवा महामार्ग अनेक वर्ष उलटली तरीही हे काम संथ गतीने सुरू आहे. रस्त्याच्या बाजूने खोदाईचे काम सुरू असल्याने बीएसएनएल पासून विविध कंपन्याचे नेटवर्क गायब झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ही समस्या निर्माण झाली असून बहुतांशी गावात कुठल्याच टेलिकॉम कंपनीचे व्यवस्थित नेटवर्क नसल्याने ऑनलाइन काम करणाऱ्या अनेकांना याचा फटका बसत आहे.
रत्नागिरी भागात मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले नाही, तोवर मिऱ्या नागपूर महामार्गाचे काम सुरू करण्यात आले. सध्या दोन्ही महामार्गाचे काम धीम्या गतीने सुरू असल्याचे पाहायला मिळते. काही भागात तर नुसती खोदाई करून ठेवण्यात आली आहे. या रस्त्याच्या बाजूने सर्वच टेलिकॉम कंपन्यांच्या फायबर सर्वत्र पसरलेल्या आहेत. जेसीबीच्या साह्याने रस्त्याच्या बाजूने खोदाई केली जात असताना एखाद्या कंपनीची फायबर तुटल्यावर रेंजची मोठी समस्या निर्माण होते. ग्रामीण भागात रेंजच्या समस्येने मोबाईल फोन बंद ठेवावे लागतात. महामार्गाच्या कामामुळे ग्रासलेल्या ग्राहकांवर कोणी रेंज देतं का रेंज…. अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
कोणत्याच कंपन्यांचे व्यवस्थित नेटवर्क येत नसल्याने अनेकांना या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. अनेक लोकांचे उद्योगधंदे ऑनलाईन असल्याने रेंजची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. रेंजची तांत्रिक समस्या दूर करण्यासाठी नेमकी तक्रार करणार तरी कुठे? असा प्रश्न ही उपस्थित होत आहे. याचा मोठा फटका आता टेलिकॉम कंपन्यांसह ग्राहकांना बसत आहे.