( रत्नागिरी )
कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या पॅसेंजर, एक्स्प्रेस मिळून एकूण सहा रेल्वे गाड्या आठवडाभरात डिझेलऐवजी विद्युत इंजिन जोडून धावणार आहेत. यापैकी दिवा ते सावंतवाडी दरम्यान दररोज धावणारी एक्स्प्रेस गाडीचा समावेश आहे. विजेवरील इंजिन जोडल्यापासून बहुतांशवेळी गाड्यांचे वेळापत्रक सुरळीत आहे.
कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाल्यानंतर या मार्गावर डिझेल इंजिनसह धावणाऱ्या गाड्या विद्युत इंजिनसह चालवल्या जात आहेत. विजेवर चालवण्यासाठी आता अजून सहा गाड्या निवडण्यात आल्या आहेत. डिझेल इंजिनच्या जागी विद्युत इंजिन जोडून चालवण्यात येणाऱ्या गाड्यांमध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस ते एर्नाकुलम द्विसाप्ताहिक १४ फेब्रुवारीपासून, एर्नाकुलम ते लोकमान्य टिळक टर्मिनस १४ फेब्रुवारीपासून, पुणे ते एर्नाकुलम द्वि साप्ताहिक एक्स्प्रेस १५ पासून, एर्नाकुलम ते पुणे १७ पासून, लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव ही आठवड्यातून चार दिवस धावणारी गाडी १८ पासून तर मडगाव ते लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान चालवली जाणारी गाडी देखील त्याच दिवशी विद्युत इंजिन जोडून चालवली जाणार आहे.
याचबरोबर मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस ते मंगळूर नियमित धावणारी गाडी १६ ला तर उलट दिशेच्या प्रवासात धावणारी मंगळूर जंक्शन ते मुंबई सीएसएमटी ही एक्स्प्रेस १७ पासून विद्युत इंजिनसह चालवली जाणार आहे. दिवा ते सावंतवाडी दरम्यान धावणारी (१०१०५) ही गाडी १२ फेब्रुवारीपासून तर तिचा परतीचा प्रवासात १३ फेब्रुवारीच्या फेरीपासून विद्युत इंजिन जोडून धावेल. याच गाडीचा रेक वापरून सावंतवाडी ते मडगाव दरम्यान धावणारी दैनंदिन पॅसेंजर गाडी (५०१०७) १२ फेब्रुवारीपासून तर मडगाव-सावंतवाडी (५०१०८) पॅसेंजर गाडी १३ फेब्रुवारीपासून विजेवर धावणार आहे.
दरम्यान, कोकण रेल्वे मार्ग धावणाऱ्या बहुतांश पॅसेंजर गाड्या डिझेल ऐवजी विद्युत इंजिनसह धाऊ लागल्या आहेत. आता उरलेल्या काही प्रवासी गाड्या देखील विद्युत इंजिन उपलब्ध झाल्यानंतर विजेवर चालवल्या जाणार आहेत.