(चिपळूण)
राज्यासह कोकणातील ग्रामीण भागात मराठी साहित्य आणि संस्कृती विषयक चळवळीचे सातत्य दिसत नसताना राजापूर लांजा तालुका नागरिक संघ (मुंबई) संस्थेने गेली आठ वर्षे ग्रामीण मराठी साहित्य संमेलने यशस्वी करून या क्षेत्रातील एक नवा बेंचमार्क सेट करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. संघाचे आठवे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन ज्येष्ठ साहित्यिक आणि इतिहास, संस्कृती, नाटय, ग्रंथालय चळवळींचे ‘जाणकार’ व्यक्तिमत्त्व प्रकाश देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली राजापूर तालुक्यातील तळवडे येथे १० ते १२ फेब्रुवारी २०२३ मध्ये संपन्न झाले आहे.
आज महानगर आणि खेडे हे अंतर वाढले आहे. आजच्या समाजाची बदललेली वैचारिक अभिरुची नव्याने लिहिताना ध्यानात घ्यावी लागेल. प्रादेशिक भाषा आणि बोली भाषेतील साहित्याला प्रतिष्ठा देणे आजची सांस्कृतिक गरज बनली आहे. नव्या साधनांनी आपल्याला मूळ भाषेपासून फारकत घ्यायला भाग पाडले आहे. संवादासाठी आम्ही चिन्हांची भाषा (इमोजी) वापरू लागलो आहोत. चिन्हांच्या भाषेचा अधिकाधिक प्रसार होणं म्हणजे परस्परातला संवाद कमी होणं ठरू शकतं. संवादहीन संस्कृती अविश्वासाकडे झुकल्यास घातक ठरू शकते. याचे भान असायला हवे आहे. आजच्या सामाजिक जीवनात मोठा अंतर्विरोध भरलेला जाणवतो आहे.
अशा काळात कोकणातल्या दोन तालुक्यात सुरु असलेली ग्रामीण मराठी साहित्याची चळवळ आशेचा ‘नंदादीप’ गेली आठ वर्षे उजळते आहे, हे महत्त्वाचे आहे. हा नंदादीप आपल्याला आपल्या मातृभाषेशी, संस्कृतीशी, मानवी समूहाशी प्रामाणिक राहायला सांगतो आहे. आपल्या परंपरांचे भान राखायला, परंपरांचा नव्या काळाशी अन्वयार्थ जोडायला, समाजजीवनाच्या नकारात्मक बाजूंवर बोलायला, विविध स्थितीगतीचे प्रवाह समजून घ्यायला प्रोत्साहित करतो आहे. हे सारं नीट समजून घेतलं तर राजापूर लांजा तालुका नागरिक संघाच्या साहित्य चळवळीतून काळावर मुद्रा उमटवणारं, दखलपात्र आणि परिणामक्षम लेखन जन्माला येईल, असा विश्वास वाटतो. आपले संपूर्ण लेख वाचण्यासाठी कृपया https://dheerajwatekar.blogspot.com/2023/02/blog-post_9.html लिंकवर क्लिक करा, असे आवाहन धीरज वाटेकर यांनी केले आहे.