(रत्नागिरी)
उष्ण लहरींनी तापमानात वाढ झाली असतानाही अवकाळी सिंचनाने कोकणातील धरणातील जलसाठ्यात गतवर्षाच्या तुलनेत चार टक्क्यांनी वाढ झाली आहे. गतवर्षी कोकणातील धरणात एप्रिल महिन्यात 55.13 टक्के जलसाठा होता. या वर्षी तो 59.52 टक्के आहे.
गतवर्षी पावसाळा सुमारे महिनाभर लांबला होता. त्याचप्रमाणे अवकाळी पावसानेही कोकणातील सर्वच जिल्ह्यात वेळोवेळी हजेरी लावली. परिणामी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा राज्यातील धरणांत पाण्याचा मोठा आणि समाधानकारक साठा जमा झाला होता. बहुतांश धरणे शंभर टक्के भरली होती. फेब्रुवारी अखेरीपर्यंत धरणांत सुमारे 75 टक्क्यांपर्यंत पाणीसाठा होता.
मार्च महिन्यामध्ये मात्र उन्हाचा चटका वाढला. पहिल्या आठवड्यानंतर तर कोकण विभाग, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात उष्णतेची तीव्र लाट आली. मार्चच्या अखेरीस आणि एप्रिलच्या सुरुवातीलाही उष्णतेच्या लाटेचा दुसरा टप्पा आला. संपूर्ण मार्च महिन्यात उन्हाच्या झळा तीव्र राहिल्या. याच कालावधीत किनारी भागात उन्हाच्या तीव्रतेने मोठ्या प्रमाणावर पाण्याचे बाष्पीभवनही झाले. त्याचा परिणाम धरणातील पाणीसाठ्यावर होणे अपेक्षित होेते. मात्र, या कालावधीत अवकाळी पावसाचे सातत्य राहिल्याने गतवर्षाच्या तुलनेत या वर्षी एप्रिल महिन्यातही धरणात जलसंचय समाधानकारक आहे.
सुरुवातीला राज्यातील धरणांमध्ये एकूण सुमारे 70 टक्के पाणीसाठा होता. त्यात मार्चमध्ये झपाट्याने घट झाली. सध्या धरणांतील पाणीसाठा 62 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार एप्रिलमध्येही बहुतांश भागांत कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार आहे. त्यामुळे या संपूर्ण महिन्यात पाणीसाठ्यात आणखी मोठी घट होण्याची शक्यता आहे. सध्या असलेला पाणीसाठा गतवर्षीच्या पाणीसाठ्याच्या तुलनेत मात्र समाधानकारक आहे.