(मुंबई)
गणेशोत्सावाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी कोकण रेल्वेकडून विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येतात. यावर्षी ७४ विशेष गाड्यांची खास सोय करण्यात आली होती. मात्र, या गाड्यांच बुकींग फुल्ल झाल्याने अतिरिक्त ३२ गाड्या सोडण्यात येणार आहे.
गणपतीसाठी कोकणात गावी जाणाऱ्या गणेशभक्तांना सुरुवातीला 74 विशेष गाड्या सोडण्यात आल्या होत्या. मात्र, यामध्ये आता वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे एकूण 106 विशेष गाड्यात कोकणात गणेशोत्सव काळात धावणार आहेत. आजपासून या अधिकच्या गाड्यांचं बुकिंग सुरु झाले आहे. दरम्यान, सुरुवातीला 74 गाड्या सोडण्यात आल्यानंतर अल्पावधितच या गाड्यांच बुकिंग फुल झालं होतं. त्यामुळे आणखी गाड्या सोडण्याची मागणी जोर धरत होती. अखेर आता कोकणात चतुर्थीसाठी गावी जायला लोकांना अधिक सोपं जावं, यासाठी कोकण रेल्वेकडून स्पेशल गाड्यांची सोय करण्यात आली आहे. अतिरिक्त 32 स्पेशल गाड्यांच्या फेऱ्यांच्या वेळा, स्टेशन आणि डब्यांची रचना यात कोणताही बदल झालेला नाही.
या स्पेशल गाड्या सीएसएमटी ते सावंतवाडी, नागपूर ते मडगाव, पुणे ते कुडाळ, पुणे-कुडाळ/थिविम, पनवेल – कुडाळ / थिविम अशा चालवल्या जाणार आहेत. या गाड्यांसाठी बुकिंग 8 जुलैपासून सकाळी 8 वाजता सुरु करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.