(मुंबई)
कोकणातील संत गजानन महाराज भक्तांसाठी खुशखबर आहे. नागपूर मडगाव एक्सप्रेस आता शेगाव स्थानकावरही थांबणार आहे. हा बदल ४ जानेवारीपासून करण्यात आल्याने गेल्या अनेक वर्षांच्या मागणीला यश आले आहे. यामुळे कोकणातील भाविकांना शेगावला जाण्यासाठी थेट गाडी उपलब्ध झाली आहे. कोकणाला विदर्भाशी जोडणारी नागपूर मडगाव एक्सप्रेस आता विदर्भाची पंढरी म्हटल्या जाणाऱ्या शेगाव स्थानकावर थांबणार आहे.
मडगाव – नागपूर एक्सप्रेस (०११३९ ) आणि नागपूर-मडगाव एक्सप्रेस (०११४० ) ही गाडी चार जानेवारी पासून शेगाव येथे थांबणार आहे. बुधवारी दुपारी तीन वाजून पाच मिनिटांनी नागपूर येथून सुटणारी ही गाडी साधारण साडेसात वाजता शेगाव रेल्वे स्टेशनवर काल पहिल्यांदाच थांबली. कोकण भागातील भक्तांना शेगाव येथे जाण्यासाठी ही गाडी अत्यंत सोयीची ठरणार आहे. मडगाव येथून रात्री आठ वाजता सुटणारी गाडी सकाळी सात वाजता पनवेल येथे पोहोचणार आहे. सकाळी 7.05 वाजता पनवेल स्थानक येथून प्रस्थान करणारी गाडी दुपारी साडेतीन वाजता शेगाव येथे पोहोचेल. ही गाडी आठवड्यातून दोन दिवस चालविण्यात येते. प्रत्येक आठवड्यातील बुधवारी आणि शुक्रवारी ही गाडी नागपूर येथून सुटेल तर प्रत्येक गुरुवारी आणि रविवारी ही गाडी मडगाव येथून सुटेल.
या एक्सप्रेस गाडीचे शेगावसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन आरक्षण देखील सुरू झाले आहे. गजानन महाराज यांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून भाविक बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे येत असतात. मात्र कोकणातील भक्तांसाठी थेट गाडी नसल्याने त्यांना पुणे, ठाणे व मुंबईहून गाडी पकडावी लागत होती. या एक्सप्रेसमुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विदर्भ आणि कोकण यांना जोडण्यासाठी अत्यंत महत्त्वाची समजली जाणारी मडगाव नागपूर एक्सप्रेस शेगाव या ठिकाणी थांबली पाहिजे या स्वरूपाची मागणी पनवेल प्रवासी संघाने लावून धरली होती.