(रत्नागिरी)
कोकणच्या राजा म्हणून ओळखला जाणारा ‘हापूस’ आंब्याला जीआय मानांकनासाठी आता खवय्यांची जोरदार पसंती लाभली आहे. आतापर्यंत कोकणातील 1 हजार 625 बागायतदार आणि प्रक्रियाधारकांनी हापूससाठी नोंदणी केली आहे.
भारतात जीआय मानांकन मिळालेली 420 उत्पादने आहेत. महाराष्ट्रातील 33 उत्पादनांचा जीआयमध्ये समावेश आहे. त्यात 25 कृषी उत्पादनांचा समावेश आहे. भौगोलिक निर्देशांक (जीआय) मिळालेल्या उत्पादनांमध्ये नोंदणी करण्यात कोकणचा राजा राज्यात दुसरा क्रमांक आहे. डाळिंब पहिल्या तर द्राक्ष तिसऱ्या क्रमांकावर आहे.
परदेशात हापूस मोठ्या प्रमाणात निर्यात केला जात आहे. त्यामुळे हापूसचा दर्जा व दर चांगला मिळावा, यासाठी बागायतदार जीआय नोंदणीकडे वळत आहेत. जीआय प्रमाणपत्र देण्यासाठी कोकणातील 3 संस्थांची नियुक्ती केली आहे. त्यामध्ये कोकण हापूस आंबा उत्पादक विक्रेते सहकारी संस्था, केळशी परिसर हापूस उत्पादक संघ आणि देवगड तालुका हापूस उत्पादक संस्थेचा समावेश आहे. आतापर्यंत 1 हजार 625 आंबा उत्पादक आणि प्रक्रियाधारकांनी जीआय नोंदणी केली आहे. कोकण हापूस आंबा उत्पादक संस्थेने 866 आंबा बागायतदार आणि 127 प्रक्रियाधारकांची नोंदणी केली आहे.