(मुंबई)
राज्यात पहिली ते दहावीपर्यंतच्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना केंद्र सरकारतर्फे प्री-मॅट्रिक स्कॉलरशिप योजनेतून दरवर्षी 1000 रुपये शिष्यवृत्ती दिली जात होती. पण आता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार नाही.राज्यातील अल्पसंख्याक विद्यार्थी आणि पालकांना यामुळे मोठा धक्का बसला आहे. या निर्णयामुळे 10 लाखांपेक्षा जास्त अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार नाही.
दहा लाखांपेक्षा अधिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकडून त्यांचे प्री-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरुन घेतले. शाळांनी ते अर्ज दाखल देखील केले. पण आता केंद्र सरकारने अचानक हे अर्ज फेटाळून लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे मागच्या वर्षी शिष्यवृत्ती मिळालेल्या आणि यंदा शिष्यवृत्तीसाठी नव्याने अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला आहे. शिष्यवृत्ती मिळणार नसल्यामुळे या विद्यार्थ्यांच्या पालकांनी संताप व्यक्त केला आहे.
राज्यातील पहिले ते दहावीपर्यंतच्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना केंद्र सरकारतर्फे प्री-मॅट्रिक स्कॉलरशिप योजनेतून दरवर्षी 1000 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. यावर्षी नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर अर्ज भरुन घेणे व पडताळणी करुन केंद्र सरकारकडे पाठविण्याची जबाबदारी शिक्षण संचालक कार्यालयाकडे देण्यात आली होती. सुरुवातीला अत्यल्प अर्ज भरले गेल्याने संचालक कार्यालयाने 31 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली. त्यानंतर पुन्हा अर्ज भरण्यासाठी 5 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ करुन देण्यात आली.
अर्ज भरण्याची प्रक्रिया देखील पूर्ण झाली आहे. आता विद्यार्थ्यांचे अर्ज शाळास्तरावर प्रमाणित झाल्यानंतर नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर अचानक अर्ज रद्द करण्याचे नोटिफिकेशन जारी करण्यात आले, त्यामुळे विद्यार्थ्यांसोबत पालकांना धक्का बसला आहे.
नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार, पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना आरटीईनुसार मोफत शिक्षणाचा लाभ दिला जातो. त्यामुळे त्यांना प्री-मॅट्रिक शिष्यवृत्तीचा लाभ दिला जाऊ शकत नाही. फक्त 9 वी आणि 10 वीच्या विद्यार्थ्यांचेच अर्ज प्रमाणित करुन ते केंद्र सरकारकडे पाठवण्यात यावेत. त्यामुळे आता राज्यातील पहिले ते आठवीच्या अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार नाही. त्यामुळे राज्यातील मुस्लिम, बोद्ध, ख्रिश्चन, शीख, पारसी आणि जैन समाजातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार नाही.