(नवी दिल्ली)
गेल्या काही वर्षांपासून खासगी कोचिंग क्लासेसचे प्रस्थ वाढले आहे. चांगल्या शाळा-कॉलेजात प्रवेश घेतल्यानंतर पालक आपल्या पाल्याला चांगल्या शिक्षणाच्या आशेने खासगी कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश घेऊन देतात. पालकांचा ओढा जास्त वाढल्याने खासगी कोचिंग क्लासेसचालकांनीही खोटी आमिषे आणि फसव्या जाहिराती करून पालकांना आपल्याकडे वळवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, आता शिक्षण मंत्रालयाने या सर्वांवर चाप लावण्याचा निर्णय घेतला आहे.
२०२३ मध्ये कोचिंग हब कोटा येथे झालेल्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर मानसिक आरोग्याच्या चौकटीचा तपशील देणारी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या संख्येत झपाट्याने वाढ झाल्याने कोचिंग उद्योगात विविध समस्या निर्माण झाल्या असल्याने केंद्र सरकारने खासगी क्लासेस उद्योगांना नवी नियमावली लागू करून चांगलाच चाप लावला आहे.
शिक्षण मंत्रालयाने नवे मार्गदर्शक तत्वे जाहीर केले असून त्यानुसार, १६ वर्षांपेक्षा कमी वयाच्या विद्यार्थ्यांची ते नोंदणी करू शकत नाहीत. तसंच, दिशाभूल करणा-या जाहिराती आणि चांगल्या गुणांची हमी देणं बेकायदेशीर ठरवण्यात येणार आहेत. सरकारने खासगी शिक्षण संस्थांसाठी नव्या गाइडलाइन्स जारी करत आदेश दिला आहे की, १६ वर्षाहून कमी वयाची विद्यार्थी कोचिंगला जाऊ शकणार नाहीत. सरकारने म्हटले आहे की, या आदेशाचे उल्लंघन केल्यास एक लाखाचा दंड आकारला जाईल. त्याचबरोबर कोचिंग सेंटरची नोंदणी रद्द केली जाईल.
कोचिंग सेंटरमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या घटना समोर आल्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला आहे. कायदेशीर चौकटीची गरज आणि खासगी कोचिंग केंद्रांच्या अनियंत्रित वाढीचे व्यवस्थापन करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या वाढत्या घटना, कोंिचग क्लासेसमध्ये आगीच्या घटना वाढल्याने, कोचिंग क्लासेसमध्ये सुविधांचा अभाव तसेच त्यांनी अवलंबलेल्या अध्यापनाच्या पद्धतींबाबत सरकारकडे आलेल्या तक्रारींनंतर मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आली आहेत.
चांगल्या गुणांची हमी देता येणार नाही
कोणतेही कोचिंग सेंटर पदवीपेक्षा कमी पात्रता असलेल्या शिक्षकांना नियुक्त करू शकत नाही. कोचिंग सेंटर्समध्ये विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी संस्था दिशाभूल करणारी आश्वासने देऊ शकत नाहीत किंवा पालकांना दर्जा किंवा चांगल्या गुणांची हमी देऊ शकत नाहीत. संस्था १६ वर्षांपेक्षा कमी वयाच्या विद्यार्थ्यांची नोंदणी करू शकत नाही. विद्यार्थ्यांची नोंदणी ही माध्यमिक शाळेच्या परीक्षेनंतरच व्हायला हवी असे मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे.