(रत्नागिरी)
कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि कागदपत्रे अपलोड करण्यासाठी सीईटी सेलकडून विद्यार्थ्यांना ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सीईटी सेलकडून १५ सप्टेंबरपासून कृषी अभ्याक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. आतापर्यंत तब्बल ३२ हजार ६३४ विद्यार्थ्यांनी कृषी अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन अर्ज भरून नोंदणी केली आहे, अशी माहिती सीईटी सेलचे आयुक्त महेंद्र वारभुवन यांनी दिली.
कृषी अभ्यासक्रमांच्या नऊ शाखांसाठीच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी सीईटीचा निकाल १५ सप्टेंबरला जाहीर होताच सीईटी सेलकडून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. कृषी विभागाने बी. एस्सी अॅग्रीकल्चर, बी.एस्सी (हॉर्टिकल्चर), बी. एस्सी (फॉरेस्ट्री), बी. एफ. एस्सी (फिशरी), बी.टेक (फूड टेक्नोलॉजी), बी.टेक (बायो टेक्नोलॉजी), बी.टेक (ॲमग्रीकल्चर इंजिनियरिंग), बी. एस्सी कम्युनिटी सायन्स, बी.एस्सी अॅग्री बिझिनेस मॅनेजमेंट या नऊ अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले होते.
कृषी अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज व कागदपत्रे अपलोड करण्यासाठी २५ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. आतापर्यंत तब्बल ३० हजार ९७३ विद्यार्थ्यांनी अर्ज भरून कागदपत्रे अपलोड केली आहेत. मात्र अद्यापही अनेक विद्यार्थ्याना अर्ज भरून नोंदणी करणे आणि कागदपत्रे अपलोड करणे शक्य झाले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन नोंदणी करणे आणि कागदपत्रे अपलोड करण्यास सीईटी सेलकडून ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय सीईटी सेलकडून घेण्यात आला आहे, अशी माहिती सीईटी सेलमधील कृषी समन्वयक डॉ. मंगेश निकम यांनी दिली. आज कृषी अभ्यासक्रम प्रवेशासाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे.