(रत्नागिरी)
रत्नागिरी शहरानजीकच्या कुवारबाव येथील एटीएम मशीन फोडून पैसे चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना शहर पोलिसांनी अटक केली. ही घटना बुधवार 31 मे रोजी मध्यरात्री 2.43 वा. घडली होती. या दोन्ही संशयितांना न्यायालयाने 2 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
सुरज अमर मोटे (21,रा.जयसिंगपूर ता.शिरोळ, कोल्हापूर) आणि गिरीराज भजनलाल गुर्जर (21,रा. सवाईमाधोपूर, राजस्थान) अशी अटक करण्यात आलेल्या दोन संशयित तरुणांची नावे आहेत.याबाबत बँक ऑफ महाराष्ट्रचे मॅनेजर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानूसार, बुधवारी मध्यरात्री दोन्ही संशयितांनी कुवारबाव येथील बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम मशीन उचकटून पैसे चोरण्याचा प्रयत्न केला. परंतू पैसे न मिळाल्याने त्यांनी एटीएम मशीनचा दरवाजा व एटीएम मशीनवरील कॅमेरा फोडून नुकसान करुन पळ काढला होता.
दरम्यान, हा सर्व प्रकार एटीएममधील सीसीटिव्हीमध्ये कैद झाला होता.बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याची बाबत बँक मॅनेजरला माहिती मिळताच त्यांनी शहर पोलिसांना याची माहिती दिली. शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत एटीएममधील सीसीटिव्ही फूटेजच्य सहाय्याने चोरीचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना रेल्वेस्टेशन येथून ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने दोघांचीही रवानगी 2 दिवसांच्या पोलीस कोठडीत केली.