कोरोना महामाराची वाढता प्रभाव पाहता रत्नागिरी शहराजवळील कुवारबाव येथे 20 बेडचे कोविड आयसोलेशन केंद्र सरपंच सौ. मंजिरी पाडळकर यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आले.
सध्या कोरोनामुळे रुग्णसंख्या वाढत आहे. या धोकादायक स्थितीमध्ये कोरोनाचा प्रसार रोखणे जरुरी असल्याने व त्याचबरोबर रुग्णांसाठी बेड उपलब्ध व्हावे याकरिता सरपंच पाडळकर यांनी विशेष लक्ष घातले आहे. त्यांनी उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या मदतीने कुवारबाव प्राथमिक शाळा उत्कर्षनगर येथे अल्पावधीत कोविड आयसोलेशन केंद्र सुरू केले. याकरिता जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, उपाध्यक्ष व आरोग्य सभापती उदय बने, तहसीलदार, गटविकास अधिकारी श्री. जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.
उद्योजक मुकेश जैन आणि कुवारबावचे भाजपाचे पदाधिकारी सतेज नलावडे यांनी केंद्र उभारण्याची संकल्पना मांडली आणि सर्वतोपरी मदत केली. या आयसोलेशन वॉर्डमध्ये सर्व सोयीसुविधा मोफत आहेत. याकरिता डॉक्टर, नर्स व स्वयंसेवक यांची व्यवस्था करण्यात येत आहे. भविष्यात जर तिसर्या लाटेमध्ये जर गरज भासली तर या केंद्राचे कोविड केअर केंद्रात रूपांतर करता येईल, अशी सरपंच सौ. पाडळकर यांची तयारी आहे. सामाजिक न्याय भवन येथेही ग्रामपंचायत मदत करत आहे. केंद्र उभारणीकरिता दीपक आपटे, विनय गोगटे, सागर अनवाल यांचेही योगदान लाभले.