(बंगळूरू)
न्यूझीलंडने एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या ४१ व्या सामन्यात श्रीलंकेचा ५ गडी राखून पराभव करून पॉइंट टेबलमध्ये पाचव्या क्रमांकावर असलेल्या पाकिस्तानसाठी मोठी समस्या निर्माण केली आहे. न्यूझीलंडच्या विजयासह पाकिस्तानच्या उपांत्य फेरीत जाण्याच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. या विजयासह न्यूझीलंडचे १० गुण झाले आहेत. पराभूत झालेला श्रीलंका यापूर्वीच स्पर्धेतून बाहेर पडला होता. न्यूझीलंडचे नऊ सामन्यांतून 10 गुण आहेत. त्यांनी पाच सामने जिंकले आहेत आणि चार गमावले आहेत. न्यूझीलंडनेही श्रीलंकेला हरवून सलग चार सामन्यातील पराभवाची मालिका खंडित केली आहे.
न्यूझीलंडच्या विजयामुळे, पुन्हा एकदा २०१९ ची झलक दिसेल, जेव्हा भारत न्यूझीलंडविरुद्ध उपांत्य फेरीचा सामना खेळला होता. मात्र, त्यावेळी टीम इंडियाचा पराभव झाला होता. न्यूझीलंड १० गुण आणि +0.७४३ च्या निव्वळ धावगतीने चौथ्या स्थानावर आहे. पात्र ठरलेली टीम इंडिया पहिल्या क्रमांकावर आहे. या स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना क्रमांक १ आणि ४ क्रमांकावर असलेल्या संघांमध्ये खेळवला जाईल.
न्यूझीलंडशिवाय पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचे संघही चौथ्या क्रमांकाच्या शर्यतीत आहेत, मात्र खराब नेट रनरेटमुळे या दोघांनाही शेवटचे सामने जिंकूनही पात्र ठरणे फार कठीण आहे. पाकिस्तानचा निव्वळ धावगती +0.0३६ आणि अफगाणिस्तानचा निगेटिव्ह -0.३३८ आहे. रचिन व कॉनवे यांनी पहिल्या १० षटकांतच ७५ धावा फलकावर चढवल्या. दरम्यान आजच्या श्रीलंका विरुध्द न्यूझीलंडच्या सामन्यात किवींच्या रचिनने कमी वयात वर्ल्ड कपच्या एका पर्वात सर्वाधिक ५२३ धावांचा सचिन तेंडुलकरच्या ( १९९६) धावांचा विक्रम मोडला. ही त्याची पहिलीच वर्ल्ड कप स्पर्धा आहे आणि पदार्पणात सर्वाधिक ५३२ धावांचा जॉनी बेअरस्टोचा (२०१९) विक्रमही त्याने आज स्वत:च्या नावावर केला. या दोघांनी १२.२ षटकांत ८६ धावा फलकावर चढवल्या अन् दुष्मंथा चमिराने ही जोडी तोडली. न्यूझीलंडकडून गोलंदाजीत ट्रेंट बोल्टने 10 षटकात 37 धावा देताना सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. लॉकी फर्ग्युसन, मिचेल सँटनर, रचिन रवींद्र यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
कॉनवे ४२ चेंडूंत ९ चौकारांसह ४५ धावांवर झेलबाद झाला. पुढच्या षटकात रचीनही बाद झाला. त्याने ३४ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ४२ धावांची खेळी केली. केन विलियम्सन आणि डॅरील मिचेल यांनी २९ चेंडूंत ४२ धावा जोडताना सामना लवकर संपवण्याचा प्रयत्न केला. पण, मॅथ्यूजने तिसरा धक्का देताना केनला ( १४) बाद केले. मार्क चॅम्पमन ( ७) रन आऊट झाला. किवींच्या विकेट पडत असल्याने पाकिस्तानच्या आशा पल्लवीत होत होत्या. पण, मिचेलने ३१ चेंडूंत ४३ धावा चोपून सामना एकतर्फी केला. न्यूझीलंडने २३.२ षटकांत ५ बाद १७२ धावा करून सामना जिंकला.
न्यूझीलंडला विजय मिळवून देताना सलामीवीर डेव्हॉन कॉनवेने 45, रचिन रवींद्रने 42 व डॅरिल मिचेलने 43 धावांचे योगदान दिले. रचिन रवींद्रने ही खेळी करताना मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. रचिनने एक धाव काढताच विक‘म आपल्या नावावर केला. 25 वर्षांखालील विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा हा विक्रम आहे. हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. तेंडुलकरने वयाच्या 25 वर्षापूर्वीच विश्वचषकात 523 धावा केल्या होत्या. रचिन रवींद्रने गत सामन्यात या विक्रमाची बरोबरी केली. 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत त्याने आतापर्यंत 523 धावा केल्या आहेत.