(रत्नागिरी)
शहरातील राजीवडा नाका येथे किरकोळ कारणातून तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीची ही घटना सोमवार ११ सप्टेंबर रोजी रात्री ११.३० वा. घडली.
या घटनेवरून अरफात मोहम्मद फणसोपकर, मोहसीन इकबाल फणसोपकर, अब्दुल्ला इकबाल फणसोपकर (तिन्ही रा. राजीवडा नाका, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तीन संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात फैजान रियाज फणसोपकर (२३, रा. राजीवडा नाका, रत्नागिरी) याने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, सोमवारी फैजानने आपली गाडी राजीवडा ब्रिजखाली लावली होती. या कारणावरुन तिन्ही संशयितांनी फैजानला राजीवडा ब्रीजखाली बोलावले. त्यानंतर तू खूप नाटके करतोस, अंगावर गाडी घालतोस असे म्हणून मोहसीन फणसोपकरने फैजानचा हात धरला तर अरफात फणसोपकरने त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली.
या झटापटीतून फैजान स्वतःची सुटका करुन घेत असताना अब्दुल्ला फणसोपकरने गाडीच्या चावीने त्याच्या डोक्यात मारुन दुखापत केली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात भादंवि कायदा कलम ३२४, ३२३ ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास शहर पोलिस करत आहेत