( राजापूर / प्रतिनिधी )
राजापूर तालुक्यातील सर्वात मोठा समजला जाणारा पाचलचा आठवडा बाजार हा मंगळवारी भरल्याने स्थानिक प्रशासनाचे सर्वच स्तरावरून आभार मानले जात आहे. या आठवडा बाजाराला काही ठराविक व्यापाऱ्यांच्या विरोध होता मात्र तरीही आठवडा बाजार भरला आणि त्याला उत्तम प्रतिसादही मिळाला.
सभोवतालाचे जवजवळ 35 ते 40 गावचे लोक बुधवारच्या आठवडा बाजारात खरेदीसाठी येतात. बुधवार हा आठवडा बाजाराचा दिवस आहे. गेली वर्षानुवर्षे हा बाजार बुधवारीच भरतो. परंतू गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज असणारे गणेशभक्त, व्यापारी तसेच ग्रामस्थ यांच्या मागणीमुळे यावेळचा आठवडा बाजार हा मंगळवारी भरावा अशी मागणी करण्यात आली होती. रोजच्या वावरात लागणाऱ्या सर्वच गृहउपयोगी वस्तू या बाजारपेठेत सहज उपलब्ध होतात. त्यामुळे मंगळवारी हा आठवडा बाजार भरवण्यात आला. गणरायाच्या सजावटीसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू सर्व सामान गणरायाच्या आगमनापूर्वी उपलब्ध झाल्याने बाजारपेठेत ग्राहकांची तोबा गर्दी उसळली होती.
बुधवारचा बाजार स्थानिक प्रशासनाने मंगळवारी भरवून योग्य तो निर्णय घेतल्याने, परिसरातील सर्वच गावच्या ग्रामस्थांच्यावतीने पाचल ग्रामपंचायतीचे, पाचल व्यापारी संघटनेचे तसेच स्थानिक पोलीस प्रशासनाचे आभार मानण्यात आले.