(मुंबई)
मुंबई महापालिकेने काळ्या यादीत टाकलेल्या कंपनीला महापालिका प्रशासनाकडून पुन्हा कंत्राट देण्याची तयारी होत असल्याच्या मुद्द्यावरून माजी परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते ॲड अनिल परब व उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.
ॲड. परब यांनी गुरुवारी याबाबत विधान केले. परिषदेच्या सभागृहात या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली. यावेळी त्यांनी या मुद्द्यावरून संबंधित कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात येणार का ? याबाबत प्रश्न उपस्थित केला. तसेच या कंपनीला पाच वर्षांसाठी ब्लॅक लिस्टेड करण्यात आले होते, पण ते नंतर दोन वर्षांसाठी करण्यात आले. असे का करण्यात आले, याबाबतचे देखील उत्तर अनिल परब यांच्याकडून विचारण्यात आले. एक कंत्राट मिळविताना मैनदिप कंपनीने मुंबईतील रस्त्यांची अगदी खराब कामे केल्याने आणि लोकांच्या तक्रारीवरून या मैनदिप कंपनीला पाच वर्षांसाठी ब्लॅकलिस्ट करण्यात आले होते, पण यानंतर या कंपनीचा हा ब्लॅकलिस्टेड कालावधी पाच वर्षांवरून दोन वर्षांवर आणण्यात आला, पण असे का करण्यात आले? याबाबतचे उत्तर आयुक्तांकडे मागण्यात आले, पण अद्यापही आयुक्तांनी याबाबतची कोणतीही माहिती दिलेली नाही, असे त्यांनी सभागृहाला अवगत केले.
दरम्यान, अनिल परब यांनी संबंधीत कंपनीबाबत दिलेली माहिती खरी आहे, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडून सांगण्यात आले. तर या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असे उदय सामंत यांच्याकडून सांगण्यात आले, पण मंत्रांच्या या उत्तरामुळे संतापलेल्या अनिल परब यांनी सरकारला फैलावर घेतले. आम्ही एखादी छोटी चुकी केली तरी आमच्यावर रात्री १२ वाजता गुन्हे दाखल करण्यात येतात. ईडीकडून आमची चौकशी करण्यात येते. मग जर का या कंत्राटदाराच्या गुन्ह्याची कबुली स्वतः महानगरपालिकेने दिलेली असून पण याच्यावर कारवाई का करण्यात येत नाही ? असा प्रश्न अनिल परब यांनी उपस्थित केला. ज्यामुळे या मुद्द्यावरून सभागृहात अनिल परब आणि मंत्री उदय सामंत यांच्यामध्ये खडाजंगी पाहायला मिळाली.