(चिपळूण /ओंकार रेळेकर )
कार्यकारी अभियंता कैलास लवेकर, अशोक काजोळकर यांच्या तात्परतेने गरीब कुटुंबाला दुर्गम भागात वीज कनेक्शन मिळाले आहे. यशवंत बाबाजी खरात आणि कुटुंबियांनी महावितरण च्या सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचे आभार मानले आहेत.
कामथे धनगरवाडीतील रहिवाशी श्री.यशवंत बाबाजी खरात हे ५ दहिवली मुकनाकवाडी येथे डोंगरपायथ्याशी कुटुंबासह स्थलांतरित झाले. दूध विकणे हेच उदरनिर्वाहचे साधन. गेली पाच वर्ष मूलभूत सुविधा रस्ता, वीज आणी पाणी यापासून वंचित असलेले कुटुंब. वीज पुरवठा घेण्यासाठी जवळपास १ किमी पर्यंत लाईन नाही. एका कुटुंबासाठी १० ते १५ पोल टाकून जंगलातून वीज मिळणार नाही, असं समजून श्री. खरात यांनी वीज मिळण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. अशातच श्री. खरात यांना अर्धांगवायू चा तीव्र झटका आला आणि त्यांचे चालणे -फिरणे बंद झाले. त्यांचेवर उपचार करण्याकरिता रात्री अपरात्री डॉ. अजय पाटील व डॉ. विजय पाटील जात असत.
श्री. खरात यांचे घरी वीज नसल्याचे डॉक्टर बंधूनी महावितरणचे श्री. काजरोळकर यांना सांगितले. श्री. खरात यांचा वीज मागणी अर्ज घेऊन काजरोळकर यांनी सावर्डे शाखाधिकारी यांना प्रकरण मंजुरीकरिता पाठविण्यास सांगितले. श्री. गाडगे यांनी जंगलातून सर्व्हे करून सदरचे प्रकरण मंजुरीकरिता सादर केले. कार्यकारी अभियंता यांनी त्वरित मंजुरी देऊन ठेकेदाराची नेमणूक केली. जागा मालकांच्या सहकार्याने प्रतीक कोल्हापुरे यांनी काम पूर्ण केले. दि.१८ मार्च रोजी कार्यकारी अभियंता श्री. कैलास लवेकर यांनी श्री. खरात यांचे घरी भेट देऊन वीज पुरवठा चालू केला.
यावेळी त्यांनी उपव्यवस्थापक श्री. काजरोळकर यांचे विशेष कौतुक केले. त्याचबरोबर शाखाधिकारी श्री. घाडगे व त्यांच्या टीमचे अभिनंदन केले. तसेच उपकार्यकारी अभियंता श्री. परीट, अति. कार्य. अभियंता श्री. वाकोडे यांचेही अभिनंदन श्री. लवेकर यांनी केले. श्री. खरात यांनी महावितरणचे आभार व्यक्त करून शाल व श्रीफळ देऊन उपस्थित अधिकाऱ्यांचा सन्मान केला. यावेळी हे आमचे कर्तव्य असून आपणास यापुढेही अशीच सेवा देण्यात येईल, असे चिपळूणचे कार्यकारी अभियंता श्री. लवेकर यांनी सांगितले.
घर तिथे वीज देण्याचे धोरण कंपनीचे असल्याने विजेविना असणाऱ्या नवीन ग्राहकांनी महावितरणच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. त्याचबरोबर डॉक्टर पाटील बंधु देत असलेल्या वैद्यकीय सेवेबद्दल त्यांनी विशेष कौतुक केले. आणी सावर्डे शाखेच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.