(रत्नागिरी)
रत्नागिरी तालुक्यातील पोमेंडी खुर्द-काजरघाटी येथील प्रसिद्ध महालक्ष्मी देवस्थानच्या शिमगोत्सवाला आज शुक्रवारपासून (ता. ३) मोठ्या उत्साहात सुरवात झाली. शुक्रवारी रुपे लावण्यात आली असून शनिवारी (ता.४) पालखी रत्नागिरीतील चवंडेवठार येथे होळी तोडण्यासाठी जाणार आहे. यावर्षी चवंडेवठार येथील प्रकाश मयेकर यांच्याकडे होळीचा मान असून दुपारी तीन वाजता पालखी होळीसह तेली आळी, रामनाका, मारुती मंदिर, नाचणे,साईनगरमार्गे रात्री ११ वाजेपर्यंत काजरघाटी येथे येणार आहे.
रविवारी (ता. ५) उत्सवाचा मुख्य दिवस असून दुपारी दोन वाजता देवस्थान परिसरात होळी उभी करण्यात येणार असून शिमगोत्सव साजरा करण्यात येणार आहे. ५ ते ८ मार्चपर्यंत पालखी मंदिरात राहणार आहे.
८ मार्चला दुपारी ११ वाजता पालखी शिंपण्यासाठी रामेश्वर मंदिरात जाईल आणि नंतर रामेश्वरवाडीतील गावभेट कार्यक्रम होणार आहे. ९ ते १५ मार्च या कालावधीत काजरघाटी गावभेट कार्यक्रम, १५ ते २० मार्च या कालावधीत कुवारबाव, गराटेवाडी, साईनगर गावभेट कार्यक्रम होणार असून २० ला सायंकाळी ७ वाजता पालखी मंदिरात आणण्यात येणार आहे. मंदिरात रुपे उतरवली जातील आणि शिमगोत्सवाची सांगता होणार आहे.
या शिमगोत्सवात ग्रामस्थांसह भाविकांनी मोठ्या उत्साहात सहभागी व्हावे, असे आवाहन महालक्ष्मी देवस्थानतर्फे करण्यात आले आहे.