(नवी दिल्ली)
काँग्रेसच्या कार्यपध्दतीवर आक्षेप घेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी पक्षातल्या सर्व पदांचा त्यांनी राजीनामा दिला आहे. गुलाम नबी आझाद हे काँग्रेसचे एक महत्त्वाचे नेते मानले जातात. त्यांच्या राजीनाम्याने काँग्रेसला मोठा धक्का बसल्याची चर्चा आहे.
गेल्या काही दिवसांपासून गुलाम नबी आझाद अस्वस्थ होते. ही अस्वस्थता पक्षाच्या बैठकीतून, त्यांच्या विधानांवरुन आणि कृतीतूनही दिसून येत होती. ते कधीही मोठा निर्णय घेतील, अशी चर्चा सुरू होती. या आधीच १६ ऑगस्ट रोजी त्यांनी जम्मू काश्मीरच्या प्रचार प्रमुख पदाचा राजीनामाही दिला होता. नियुक्तीच्या अवघ्या काही तासांमध्येच त्यांनी हा राजीनामा दिला होता. त्यामुळे त्यांची नाराजी उघडकीस आली होती.
या पूर्वी त्यांनी वारंवार काँग्रेसच्या कार्यपद्धतीबद्दल आपला आक्षेप नोंदवला होता. सोनिया गांधींना त्यांनी याबद्दल पत्रही लिहिले होते. जी-२३ नेत्यांचे नेतृत्वही त्यांनी केले होते. शिवाय या गटावर काँग्रेसकडून होणा-या टीकेमुळेही ते अस्वस्थ होते. आनंद शर्मा यांनीही दोन दिवसांपूर्वी आपल्यावरच्या जबाबदा-यांचा त्याग केला होता.