(खेड)
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास बेळगाव- माणगांवच्या दिशेने जाणारा मालवाहू ट्रक दरीत कोसळला. या अपघातात चालक बालंबाल बचावला आहे. चालक प्रशांत चंद्रकांत देसाई (२८ रा. कोथळी-बेळगाव) हा आपला ट्रक घेऊन माणगावला जात असताना घाटातील अवघड वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक उजव्या बाजूला २०० फूट दरीत कोसळला.
या अपघातात जीवितहानी झाली नसली तरी ट्रकचे नुकसान झाले. चालकास किरकोळ दुखापती झाल्या असून उपचारासाठी पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताचे वृत्त कळताच कशेडी येथील वाहतूक पोलीस मदत केंद्राचे पोलीस निरीक्षक अनिल चांदणे व सहकारी घटनास्थळी पोहोचून जखमी चालकास मदतकार्य केले.