(नवी दिल्ली)
कर्नाटकातील मुख्यमंत्रीपदाचा पेच निकालाच्या ५ दिवसानंतरही सुटलेला नाही. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर बुधवारी माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी राहुल गांधी यांची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत मुख्यमंत्रीपदाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा झाल्याचे समजते. डी. के. शिवकुमार यांनी पहिल्यादाच मुख्यमंत्रीपदाशिवाय सत्तेत इतर कुठलेही पद स्वीकारणार नाही, अशी जाहीर भूमिका घेतल्याचे समजते. त्यामुळे सिद्धरामय्या यांच्या नावाची घोषणा करायची की मुख्यमंत्रीपद दोघांमध्ये वाटून दयायचे, यावर निर्णय घेतला जाणार आहे.
तडजोड करायचीच असेल तर दोन्ही बाजूने होऊ द्यात. अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद विभागून घ्यायचे असेल तर आधीची अडीच वर्षे मला द्या, नंतर सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री करा. अन्यथा मी केवळ एक सामान्य आमदार म्हणून काम करण्यास तयार आहे, अशी भूमिका डी. के. शिवकुमार यांनी घेतल्याची सूत्रांची माहिती आहे.