(बंगळुरू)
कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी सिद्धरामय्या विराजमान होणार आहेत, तर डीके शिवकुमार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. यावर गुरुवारीच शिक्कामोर्तब झाले आहे. कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींनी तीन दिवसांच्या मंथनानंतर हा तोडगा काढला. सिद्धरामय्या दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार आहेत. या वेळी काही मंत्रीही शपथ घेण्याची शक्यता आहे. या शपथविधीला देशभरातील अनेक नेत्यांना आमंत्रण देण्यात आले आहे. हा सोहळा दुपारी साडेबारा वाजता पार पडणार आहे.
२२४ पैकी १३५ जागांवर दणदणीत विजय मिळवून काँग्रेसने कर्नाटकवर सत्ता काबीज केली. परंतु निवडणूक जिंकल्यानंतर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरत नव्हता. डीके शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्यात चुरस निर्माण झाली. मात्र, तीन दिवसांच्या मंथनानंतर सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री आणि डीके शिवकुमार यांच्यावर उपमुख्यमंत्रिपदाची धुरा सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, आज २० मे रोजी कर्नाटकात शपथविधी सोहळा होणार आहे.
यावेळी अनेक मंत्रीही मंत्रीपदाची शपथ घेतील. या शपथविधी सोहोळ्याला सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांना आमंत्रण देण्यात आले आहे. तर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदरसिंग सुखू, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन, तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, एनसी अध्यक्ष फारुख अब्दुल्ला आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांना आमंत्रण पाठवण्यात आले आहे.
शपथविधी सोहळय़ासाठी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांना आमंत्रण न दिल्यामुळे केरळमधील सत्ताधारी डावी लोकशाही आघाडीने (एलडीएफ) नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसच्या या निर्णयावरून त्यांचे अपरिपक्व राजकारण आणि कमकुवतपणा दिसून येतो, तसेच काँग्रेस भाजपविरोधी शक्तींना एकत्र करू शकत नाही हे यावरून दिसते, अशी टीका एलडीएफचे समन्वयक ई. पी. जयराजन यांनी केली.