(पुणे)
डेक्कन वाहतूक विभागातील तिघा पोलीस हवालदारांना वाहतूक पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे. रस्त्यावर कोंडी झालेली असताना देखील वाहतूक नियमनाचे काम सोडून तिघे एकत्र कारवाई करताना आढळून आले होते. सर्वात गंभीर प्रकार म्हणजे त्यांनी आपली नेमप्लेट झाकून ठेवली होती.
जितेंद्र दत्तात्रय भागवत, जयशिंग यशवंत बोराणे, गोरख मारुती शिंदे (सर्व नेमणूक डेक्कन वाहतूक) अशी निलंबीत करण्यात आलेल्या पोलीस हवालदारांची नावे आहेत. पोलीस उपायुक्त मगर हे जंगली महाराज रस्त्त्यावर शनिवारी (दि.16) होते. त्यावेळी वाहतूक कोंडी सुरूळीत करण्याचे आदेश त्यांनी दिले. डेक्कन वाहतूक विभागाला माहिती मिळाल्यानंतर ठाणे अंमलदार पाटील यांनी संबंधीत कर्चमाऱ्यांना ही माहिती दिली.
दरम्यान, पोलीस उपायुक्त मगर हे लॉ कॉलेज रोडने भांडारकर रोडकडे जाताना हे तिघे हवालदार वाहतूक नियमन सोडून एकत्र कारवाई करताना आढळून आले. वाहतूक नियमन हे प्रथम कर्तव्य असताना सुद्धा हे तिघे एकत्र नेमप्लेट झाकून कारवाई करताना दिसले. तर यावेळी एका कर्मचाऱ्याने उपायुक्तांची गाडी पाहून धुम ठोकली. तिघांनी केलेले वर्तन हे बेशिस्त बेजबाबदारपणाचे असल्याचा ठपका ठेवत तिघांनी निलंबीत करण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे.