(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील करबुडे कपिलवस्तुनगर येथील संबोधी बुद्धविहारात नुकताच वर्षावास कार्यक्रम मोठ्या उत्साहात व नेटक्या नियोजनात करबुडे बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक ३८च्या वतीने संपन्न करण्यात आला. बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा रत्नागिरी यांच्या विद्यमाने वर्षावास कार्यक्रम करबुडे कपिलवस्तुनगर येथील संबोधी बुद्धविहारात करबुडे गावशाखेचे अध्यक्ष संतोष कृष्णा जाधव व महिला मंडळाच्या अध्यक्षा नंदिनी नागेश जाधव यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली घेण्यात आला.
या वर्षावास कार्यक्रमात करबुडे गावशाखेने आपल्या वाडीवस्तीतील शालेय विद्यार्थ्यांची समता सैनिक दलाच्या सैनिकांसारखी केलेली वेशभूषा संपूर्ण कार्यक्रमाची खास लक्षवेधी बाब ठरली. या कौतुकास्पद उपक्रमाचे तालुका शाखा रत्नागिरी चे उपाध्यक्ष विजय आयरे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून विशेष अभिनंदन केले. तसेच करबुडे गावशाखेच्या संपूर्ण नेटक्या नियोजनची ही त्यांनी चांगली स्तुती केली.या कार्यक्रमात रत्नागिरी तालुका शाखेच्या संस्कार समितीचे अध्यक्ष संजय आयरे यांचे बौद्ध धम्म व त्याचे ब्राम्हणीकरण या विषयावर आधारित अतिशय प्रबोधनात्मक धार्मिक प्रवचन संपन्न झाले.
यावेळी त्यांनी विविध उदाहरणे देऊन बौद्ध धम्मातील चांगल्या गोष्टींचे कशाप्रकारे बदलवून टाकल्या,याबद्दल मौलिक मार्गदर्शन केले.तसेच प्रत्येक बौद्ध व्यक्तीने भगवान गौतम बुद्धाच्या चांगल्या मार्गावर आरूढ होऊन आपली वाटचाल करावी असे आवाहन केले.या कार्यक्रमाच्या प्रारंभी करबुडे कपिलवस्तुनगर येथील संबोधी बुद्धविहारात सामुदायिक धार्मिक पूजापाठ उपस्थित बौध्दाचार्य व श्रामणेर यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला.त्यानंतर करबुडे गावशाखेच्या वतीने तालुका शाखेचे प्रमुख पदाधिकारी व अन्य गावशाखांचे प्रतिनिधी यांचे यथोचित स्वागत करण्यात आले.त्यानंतर तालुका शाखेच्या वतीने ही करबुडे गावशाखेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले.
तसेच करबुडे गावशाखेच्या वतीने स्थानिक शाखेचे सभासद तथा माजी तहसीलदार विजय गोविंद जाधव यांची रत्नागिरी येथील थिबा राजा बुद्धविहार समितीवर हिशोब तपासणीस पदावर नियुक्ती झाल्याबद्दल यथोचित सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमात समता सैनिक दलाच्या वेशभूषेत करबुडे कपिलवस्तुनगर येथील हर्ष हेमंत जाधव, आर्यन मंगेश जाधव,वैभव अस्तिक जाधव,श्रुतिका रूपेश जाधव,मधुरा दीपक जाधव व श्रुती संतोष जाधव सहभागी झाले होते.या विद्यार्थ्यांना ध्यान साधना आणि समता सैनिक दलाचे प्रशिक्षण तसेच वंदना ( पूजापाठ)शिकवणारे माजी मुख्याध्यापक दिलीप वासनिक,सेवानिवृत्त वन खात्याचे अधिकारी प्रमोद जाधव,गौतम जाधव,ग्रा.पं. सदस्य विलास जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
या संपूर्ण कार्यक्रमाला रत्नागिरी तालुका शाखेचे उपाध्यक्ष विजय आयरे,चिटणीस सुहास कांबळे,कोषाध्यक्ष मंगेश सावंत,संस्कार समितीचे सचिव रविकांत पवार ,दिनकर कांबळे,जयवंत कदम आदी मान्यवर उपस्थित होते.तसेच करबुडे गावशाखेतील लहानथोर बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी करबुडे गावशाखेतील सर्व सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.