अर्धा ऑक्टोबर संपला तरी अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे, पावसाचे परतीचे चिन्ह नाही. अनेकदा सप्टेंबरमध्ये पाऊस संपतो. परंतु यंदा अद्याप पाऊस सुरूच आहे. यासंदर्भात अनेक तज्ज्ञांनी आपले मत व्यक्त केले असून, पावसाळा लांबण्यामागे अनेक कारणे असू शकतात, असे त्यांचे म्हणणे आहे. यातील मुख्य कारण म्हणजे हवेतील कमी दाबाचे पट्टे. जेव्हा उष्णता वाढते तेव्हा हवेचा दाब कमी होतो. त्यामुळे हवा वरच्या दिशेने जाते. त्यातून अधिक दाबाचा पट्टा असलेल्या परिसरातील ढग अपेक्षेनुसार कमी दाबाच्या परिसरात जातात आणि यातून जोरदार पाऊस पडतो, असे सांगण्यात आले.
यंदाची परिस्थिती पाहता ऑक्टोबर महिन्यात, नैऋत्य मोसमी पावसाने माघार घेत ईशान्य मान्सूनला मार्ग दिला आहे. दक्षिणेकडील द्वीपकल्पीय भागात, प्रामुख्याने पूर्वेकडे ईशान्य वा-यांमुळे ऑक्टोबर व पुढील काळात पाऊस पडतो. भारताच्या उत्तर भागात पश्चिमेकडून येणा-या वा-यामुळे केवळ पाऊसच नव्हे तर हिमवर्षावही होतो.
नैऋत्य मान्सून साधारणपणे ऑक्टोबरच्या सुरुवातीस पूर्णपणे थांबतो. पण परतीच्या वेळी अनेक भागात गडगडाट, वादळे आणि मुसळधार पाऊस होऊ शकतो. यंदा बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे मान्सून अद्याप परतीच्या मार्गात नाही. तसेच हवामान खात्याच्या अंदाजानुसार १२ ते १३ ऑक्टोबरपर्यंत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.
मोसमी पावसाच्या काळात समुद्रातून कोणतेही बाष्प येत नसताना किंवा कमी दाबाचे क्षेत्र कार्यरत नसताना होणारा पाऊस स्थानिक स्थितीतून होत असतो. आकाशाची स्थिती निरभ्र राहिल्यास सूर्यकिरणे थेट जमिनीपर्यंत पोहोचतात. साहजिकच जमीन तापू लागते आणि निसर्ग नियमाप्रमाणे त्यातून निर्माण होणारे बाष्प आकाशाकडे जाऊ लागते. या काळात आपल्याला प्रचंड उकाडा जाणवतो. बाष्पाच्या प्रमाणानुसार दुपारनंतर लगेचच किंवा संध्याकाळी आकाशात ढग तयार होतात. घर्षणातून ते गरजतात, विजांचीही निर्मिती होते आणि पाऊस पडतो. हा पाऊस खूप विस्तृत भागावर नसतो. कधी-कधी मोठे आणि अधिक उंचीचे ढग तयार होऊन ठरावीक भागांतच ढगफुटीप्रमाणे पाऊस होतो.
‘ऑक्टोबर हिट’ अधांतरीच
साधारण पावसाच्या परतीला लागूनच राज्यात थंडी पडण्याआधी हवामान उष्ण होते. ऑक्टोबरमध्ये किनाऱ्यालगत ३० ते ३८ अंशापर्यंत तापमान वाढून ऑक्टोबर हिटचा सामना करावा लागतो. मात्र यंदा अद्याप पाऊसच कायम असल्याने काही दिवसांपासून वातावरणात गारवा वाढला आहे. यामुळेच यंदा तरी कोकणवासीयांनाही ऑक्टोबर हिटचा तडाखा सहन करावा लागणार नाही, अशी चिन्हे आहेत.