क्रिकेटला महान अनिश्चिततेचा खेळ म्हटले जाते. कारण क्रिकेटमध्ये मैदानावर प्रत्येक चेंडूगणिक काही ना काही कारनामा होत राहतो. कधी कुठला खेळाडू रेकॉर्ड करेल आणि दुसऱ्याच चेंडूवर कोण कुणाचे रेकॉर्ड मोडेल काहीच सांगता येत नाही. परंतु मैदानावरचे काही रेकॉर्डस् तर असे असतात जे इतिहासच बनून जातात, जी मोडणे अशक्य वाटतात. आज आम्ही तुम्हाला भारतीय क्रिकेट खेळाडू वीरेंद्र सेहवागने अशाच एका रेकॉर्डबद्दल सांगणार आहोत, जे सहजासहजी कुठल्याच खेळाडूला मोडता येणार नाही.
एका चेंडूत तब्बलसतरा धावा
क्रिकेटच्या इतिहासातील १३ मार्च हा तो दिवस !भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये एक वनडे सामना खेळवण्यात आला होता. भारताकडून सलामीवीर म्हणून विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग मैदानात उतरला होता. त्यावेळी वीरेंद्र सेहवागची जगातील सर्व संघांच्या गोलंदाजांच्या मनामध्ये एक भीती निर्माण झाली होती. कुठल्याच बॉलरला दयामाया न दाखवता मैदानाच्या चारी दिशांना सेहवाग तुफान फटकेबाजी करायचा.
अशामध्ये पाकिस्तान संघाचा राणा नावेद-उल-हसनने चेंडूला हातात घेतला. समोर सेहवाग म्हणल्यावर थोडेसे दडपण होतेच. अशा दडपणाखालीच राणाने पहिला चेंडू नोबॉल टाकला आणि सेहवागने कडक चौकार लगावला. राणाने दुसरा चेंडूही नोबॉल टाकला आणि सेहवागने चौकाराची पुनरावृत्ती केली.सलग दोन नोबॉल टाकल्यानंतर राणावर दडपण आले आणि त्याने तिसरा नोबॉल टाकला, पण तो निर्धाव गेला. त्यानंतर राणाने चौथा चेंडूही नोबॉल टाकला आणि सेहवागने पुन्हा एकदा त्यावर चौकार लगावला. पाचव्यांदा राणाने अजून एक नोबॉल टाकला पण तो निर्धाव गेला.
अशाप्रकारे पाच नोबॉल आणि तीन चौकार असे मिळून सेहवागने राणाच्या एका चेंडूवर १७ धावा काढून विश्वविक्रम केला.