(मुंबई)
मुंबईतील आमदार राम कदम यांच्या मतदार संघात अंगावर कंबल टाकून विकलांग व्यक्तींवर उपचार करणाऱ्या राजस्थानातील कंबलबाबांवर जादूटोणा विरोधी कायद्याखाली कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने करण्यात आली आहे.
समितीच्यावतीने डॉ. मुक्ता दाभोलकर, अण्णा कडलास्कर, मिलिंद देशमुख, राहुल थोरात, प्रशांत पोतदार, नलिनी जाधव आदींनी ही मागणी केली आहे. आ. राम कदम यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांसमवेत गेली दहा वर्षे कं बलबाबा सर्वसामान्यांची फसवणूक करीत आहे. स्वतःच्या अंगात दैवी शक्ती असल्याचा दावा केला जात आहे. चमत्कार करण्याचा दावा करणे हा दखलपात्र, अजामीनपात्र गुन्हा आहे. जवळपास एक हजारांपेक्षा जास्त भोंदुबाबांवर या कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विकलांग लोकांवर कंबळबाबा टाकून तथाकथित उपचार सुरू असल्याचा दावा कंबलबाबा करीत आहेत.
उपचारादरम्यान आमदार राम कदम यांच्यासह अनेक पोलीस अधिकारीदेखील उपस्थित आहेत. गेली दहा वर्षे महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा अस्तित्वात आहे. राज्य शासन, पोलीस यंत्रणा यांनी संयुक्तपणे कंबलबाबावर या कायद्यान्वये गुन्हा दाखल करून विकलांग व्यक्तींची कायमस्वरूपी सुटका करावी अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने करण्यात आली आहे.