(चिपळूण / ओंकार रेळेकर)
विविध संसर्गाबाबत जनजागृती करण्यासाठी ऑन्को लाईफकेअर कॅन्सर सेंटरच्या वतीने संसर्ग प्रतिबंध सप्ताह चिपळूणसह, सातारा, तळेगाव आणि गडहिंग्लज येथे साजरा करत रूग्णालयात एका प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात संसर्ग प्रतिबंध कशाप्रकारे रोखता येईल तसेच हात स्वच्छतेबाबतही मार्गदर्शनपर व्याख्यान आणि याविषयावर पोस्टर मेकींग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ७० हून अधिक डॉक्टर आणि पॅरामेडिकल कर्मचारी सहभागी झाले होते.
या कार्यक्रमाला आँन्को लाईफ कँन्सर सेंटर ग्रुपचे श्री. उदय देशमुख, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, श्री. सचिन देशमुख, व्यवस्थापकीय संचालक, डॉ. प्रताप राजेमहाडिक, संसाधन संचालक, श्री. अर्पित कोहली, मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. तेजल गोरासिया, वैद्यकीय संचालक, डॉ. मनोज लोखंडे, सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट आणि डॉ.प्रसाद कवारे, संसर्ग नियंत्रण अधिकारी उपस्थित होते.
हात धुण्याचे योग्य तंत्र हे अतिशय प्रभावी ठरत असून ते एखाद्या संसर्गाचा प्रसार रोखू शकते. प्रत्येकाला हातांच्या स्वच्छतेचे महत्त्व माहित असले तरी हात धुण्याचे योग्य तंत्र सर्वानाच माहित असते असे नाही. संसर्ग प्रतिबंधाच्या मुलभूत तत्वांवर आधारीत संकल्पनेवर या सप्ताहाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमातंर्गत Dr Schumacher India Pvt Ltd च्या माध्यमातून हातांच्या स्वच्छतेवर एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली. याव्यतिरिक्त, कार्यक्रमाचा एक भाग म्हणून संक्रमणास प्रतिबंधक करणाऱ्या पद्धती दर्शविणाऱे पोस्टर्सही प्रदर्शित करण्यात आल्याची माहिती, डॉ प्रसाद कवारे यांनी दिली.
श्री सचिन देशमुख, व्यवस्थापकीय संचालक, आँन्को लाईफ कँन्सर सेंटर सांगतात की, संक्रमणास प्रतिबंध करण्याचा तसेच संक्रमण नियंत्रणाकरिता योग्य पध्दतीने हात धुण्याचे तंत्र अतिशय उपयुक्त ठरते. खोकताना- शिंकताना पाळावयाचे नियम व शिष्टाचार, लसीकरण याबाबत माहिती देऊन जागृती निर्माण करण्याचा मानस आहे. महिलांसाठी एचपीव्ही लसीकरणासारखी अनेक शिबिर ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरच्या वतीने वर्षभर राबविण्यात येतात.
महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग टाळण्यासाठी २००० हून अधिक महिलांना लसीकरण देखील करण्यात आले आहे. ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरचे सर्व युनिट एचपीव्ही लसीकरण सेवा पुरवतात जी गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग टाळण्यासाठी एकमेव लस आहे तसेच कर्करोगाविषयी जनजागृती आणि लवकरात लवकर उपाचाराचे महत्व नागरिकांना पटवून देण्यासाठी अनेक उपक्रम नियमित राबविले जातात.