(रत्नागिरी/प्रतिनिधी)
एकीकडे बाजारात गणेशोत्सवाची लगबग सुरू आहे. मात्र या सणोत्सवाच्या काळात महागाईची प्रचंड झळ ग्राहकांना सोसावी लागत आहे. अगोदरच अन्नधान्यासह दैनंदिन लागणा-या जवळपास सर्वच वस्तूंवर जीएसटी लावल्याने महागाईचा सामना करावा लागत आहे. मात्र, महागाईचा हा धडाका थांबताना दिसत नाही. गणेशमूर्तींसह जवळपास सर्वच वस्तू महाग झाल्या आहेत. तर आता त्यात सर्वसामान्यांचा हक्काचा नाष्टा असणा-या पोह्यावरही सरकारची वक्रदृष्टी पडली असून, आता सर्वच प्रकारचे पोहेही महागले आहेत. पोह्यांचे दर पाच ते दहा रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे महागाईचा झळा आणखी तीव्र होत चालल्या आहेत. यात सर्वसामान्य माणूस होरपळून निघत आहे.
केंद्र सरकारने किराणा दुकान, मॉलमधील जीवनावश्यक वस्तूंवर सरसकट जीएसटी लागू केल्याने अगोदरच अन्नधान्यासह दही, तूप, लोण्याचे दर वाढले आहेत. आता गूळ, पोह्यावरही जीएसटी लागू झाल्याने दगडी पोहे, जाड पोहे, भाजक्या पोह्याचे दर वाढले आहेत. एकीकडे कच्च्या मालाचा तुटवडा, इंधन दरवाढीमुळे दळणवळणाचा वाढलेला खर्च त्यात कच्चा मालासह पक्क्या मालावर लावण्यात येणारा कर याचा एकत्रित परिणाम मालाच्या किमतीवर जाणवू लागला आहे.
काही बड्या उद्योगपतींच्या दबावामुळे सरकारने सर्वसामान्यांनावर जीएसटी लावल्याची ओरड व्यावसायिक करत आहेत. विशेष म्हणजे २५ किलोच्यावर वस्तू घेतल्या, तर त्यावर जीएसटी नाही. २५ किलोच्या आतील वस्तू घेतल्या तर त्यावर जीएसटी आहे. २५ किलोवरचे धान्य घेणा-या व्यवहाराच्या त्यावर जीएसटी लागत नाही. एक दोन किलोचे धान्य विकताना ग्राहकांच्या माथी जीएसटीचा भार लादला जात आहे. त्यामुळे व्यापारीही संभ्रमात पडले असल्याचे चित्र आहे.
सणासुदीच्या अगोदरपासूनच जवळपास सर्वच वस्तूंचे दर वाढले असून, सर्व किराणा मालासोबतच गूळ, तूप शेंगदाण्यासह अनेक डाळीच्या भाववाढीची स्पर्धाही कायम आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. तर यापुढे आता सण साजरे करायचे की नाही हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.