(रत्नागिरी)
जिल्ह्याला चौदा हजार मेट्रीक टन खताचे आवतन मंजूर असून मे महिन्यापर्यंत साडेतीन हजार मेट्रीक टन येणे अपेक्षित होते; परंतु आतापर्यंत अवघे 636 मे. टन म्हणजेच अवघे पंधरा टक्केच खत प्राप्त झाले आहे. जिल्ह्यात खताचा तुटवडा जाणवत असून शेतकरी नाराज झाले आहेत. कंपन्यांकडून खत उपलब्ध होत नसल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
जिल्ह्यात गतवर्षी 13 हजार 519 मे. टन खताचा तर 6 हजार 061 क्विंटल बियाण्यांचा पुरवठा झाला होता. 2022 च्या खरीप हंगामासाठी विविध खतांची 22 हजार 146 मे. टनाची मागणी केली असून शासनाने 14 हजार 640 मे. टन आवंटन मंजूर केले आहे. तसेच 9 हजार 454 क्विंटल बियाण्याची मागणी आहे. यातील मे महिन्यापर्यंत साडेतीन हजार मे. टन खत दाखल होणे आवश्यक आहे; परंतु तुलनेत 15 टक्केच खत आले.
वाहतुकीच्या निविदांची प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याचे कारण खत पुरवठा करणार्या कंपन्यांकडून दिले जात आहे. त्यामुळे सध्या रस्ते मार्गे खत आणले जात आहे. कोकण रेल्वेतून खताची वाहतूक वेळेत सुरु झालेली नाही. यंदा पाऊस अपेक्षेपुर्वीच सुरु होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवल्यामुळे भात पेरण्यांना लवकर आरंभ होईल. त्याआधी खतं शेतकर्यांपर्यंत पोचणे आवश्यक आहे. अन्यथा पेरण्या विलंबाने कराव्या लागतील.
युक्रेन-रशिया युध्दामुळे खतांचा तुटवडा जाणवू नये यासाठी कृषी विभागाकडून शेतकर्यांना वेळेत मागणी नोंदवण्याचे आवाहन पंधरा दिवसांपुर्वी करण्यात आले होते. त्यानुसार कार्यवाही चालू झाली आहे.