(संगलट-खेड / इक्बाल जमादार)
राज्यतील एस. टी. महामंडळ नफ्यात आणण्यासाठी राज्य सरकारने त्रिसूत्री कार्यक्रम राबविल्यास आशिया खंडातील सर्वात मोठे महामंडळ नफ्यात येण्यास वेळ लागणार नाही, असे मत महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेचे राज्याध्यक्ष श्री. संदीप शिंदे यांनी चिपळूण येथील कामगारांच्या संवाद बैठक मेळाव्यात व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले की राज्यातील इतर महामंडळा पेक्षा एस. टी. महामंडळ हे राज्य सरकारला उत्पन्न मिळवून देत राज्याच्या विकासात आर्थिक हातभार लावत असते. हे महामंडळ चालवणेसाठी राज्यसरकारने एस. टी. महामंडळ भरत असलेला १७% प्रवासी कर कमी करावा, एस. टी. टोलमुक्त करावी आणि एस. टी. महामंडळ हे राज्याचा अंगीकृत व्यवसाय असल्याने एस. टी. कडून खरेदी करण्यात येणाऱ्या डिझेल वरील अबकारी कर राज्य सरकारने माफ केल्यास एसटी तोट्यातून बाहेर पडण्यास मदत होईल. यासाठी राज्यसरकारने वरील त्रिसूत्री राबविण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
एस. टी. कामगारांचा सन २०१६/२०२० चा प्रलंबित असलेल्या वेतन करातील ४८४९/- कोटी रकमेचे पूर्ण वाटप झाले नसल्याचा पुनरुच्चार करीत, येत्या काही दिवसात याचा कोर्टातील निर्णय लागून त्यात शिल्लक राहत असलेली रक्कमही कर्मचाऱ्यांच्या वेतनात समाविष्ट करण्याची मागणी केली असल्याचे सांगितले. तर सन २०१६- २०२० आणि २०२१ ते २०२५ असा १० वर्षाचा वेतन करार पदनिहाय वेतननिश्चितीसह सातवा वेतन आयोग लागू करावा यासाठी संघटना दहा वर्षाच्या करारावर सही करण्यास तैयार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी व्यासयसपीठावर विभागीय अध्यक्ष श्री. राजेश मयेकर, विभागीय सचिव श्री. संदेश सावंत, विभागीय खजिनदार अनिल चव्हाण, चिपळूणचे सचिव रवी लवेकर, बाळाराम सोंडकर, क्यूआर्टी राज्यकार्यकारिणी सदस्य श्री. उमेश खेडेकर व सर्व डेपोचे पदाधिकारी तसेच असंख्य सभासद यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभागीय सचिव श्री. संदेश सावंत यांनी केले.
सन २०२३ साठी रत्नागिरी विभागाचे कार्यकारी मंडळाची घोषणा करण्यात आली असून विभागीय अध्यक्षपदी श्री. राजेश मयेकर, विभागीय सचिव पदी श्री. रवींद्र लवेकर, खजिनदार म्हणून श्री अमित लांजेकर यांची निवड करण्यात आली नवनियुक्त कार्यकारिणी चे राज्याध्यक्ष श्री. संदीप शिंदे यांनी अभिनंदन केले