(संगमेश्वर / प्रतिनिधी)
देवरुख येथे एस के ४ ची लागवड सर्वत्र होणे गरजेचे आहे. यासाठी शेतकऱ्यांनी पुढे येणे गरजेचे आहे. कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सज्ज आहेत. या लागवडीच्या माध्यमातून हळदीचा एक ब्रँन्ड तयार होणे गरजेचे आहे. मार्केटिंगसाठी शेतकऱ्यांना रत्नागिरी जिल्हा परिषदेतर्फे सहकार्य केले जाईल, असे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी दिले.
संगमेश्वर तालुक्यातील कर्ली फाटा येथे जिल्हा परिषद रत्नागिरी व संगमेश्वर पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने एस के ४ हळद लागवड कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी ते बोलत होते.
रत्नागिरी जिल्हा परिषदेतर्फे एसके ४ जातीच्या हळद लागवडीच्या प्रयोगासाठी ४ तालुक्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये गुहागर, चिपळूण, खेड व संगमेश्वर यांचा समावेश आहे. प्रत्येक तालुक्यात १० गुंठे क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. संगमेश्वर तालुक्यात कर्ली फाटा येथे गोविंद चाळके यांच्या शेतजमिनीत हळद लागवडीचा शुभारंभ करण्यात आला.
शुभारंभावेळी कृषी विकास अधिकारी अजय शेंडे, संगमेश्वरचे गटविकास अधिकारी भरत चौगले, सहायक गटविकास अधिकारी विनोदकुमार शिंदे, विस्तार अधिकारी गजेंद्र पौनिकर, कृषी अधिकारी राजकुमार धायगडे, भीमराव पाटील, शंकर घुले, जयवंत पारसे, प्रणय भायनाक, प्रगतिशील शेतकरी सचिन कारेकर, सांगवे सरपंच देवदत्त शेलार, विलास शेलार, मनोहर चाळके, गोविंद चाळके, निवृत्त तालुका कृषी अधिकारी हेमंत तांबे, ग्रामसेवक विवेक चौगुले उपस्थित होते.