(मुंबई)
एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण व्हावे व इतर काही मागण्यासाठी राज्यभरातील एसटी कर्मचारी गेले 5 महिने आझाद मैदानावर आंदोलनावर ठाम होते. मात्र हा संप योग्य नसल्याचे सांगत न्यायालयाने संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रूजू होण्यासाठी २२ एप्रिलपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. न्यायालयाचा आदेश मानत राज्यातील विविध आगारात एसटी कर्मचारी सेवेत रुजू झाले. गेल्या पाच महिन्यांपासून सुरू असलेला संप संपत असतानाच दिवाळीनंतर आता पुन्हा एकदा संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणासाठी आंदोलन छेडणार असल्याचा इशारा दिला आहे.
या आंदोलनापूर्वी एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण व्हावे, या प्रमुख मागणीसह राज्यातील संपूर्ण आगारात आंदोलनासाठी मोर्चेबांधणी केली जाणार आहे. एसटी लढा विलीनीकरणाचा महाराष्ट्र राज्याचे सदस्य सतीश मेटकरी यांनी विलीनीकरणासाठी राज्यातील प्रत्येक आगारात कर्मचाऱ्यांशी संवाद साधला जाणार असल्याचे सांगितले. या आंदोलनाचे नेतृत्व आमदार गोपीचंद पडळकर करणार असल्याचेही माहिती त्यांनी दिली.
विलिनीकरणाची मागणी आणि आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्यांबद्दल सहानुभूती न दाखविल्याबद्दल एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावर दगडफेक, चप्पलफेक केली असल्याची माहिती सांगण्यात येते. मात्र या हल्ल्यात सामील असलेल्या ११५ एसटी कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर निलंबनाची टांगती तलवार आहे.
दरम्यान, जामिनावर असलेल्या या कर्मचाऱ्यांवर महामंडळाकडूनही कारवाई करण्यासाठी पोलिसांकडून अहवाल मागवण्यात आल्याची माहितीही प्राप्त झाली आहे. लवकरच त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे महामंडळाचे संकेत आहेत.