(मुंबई)
एसटीने विविध घटकांतील सवलत धारकांना स्मार्ट कार्ड बंधनकारक केले असले तरी गणेशोत्सव, दिवाळीच्या कालावधीत ज्येष्ठ नागरिकांची तसेच इतर सवलतधारकांची गैरसोय होऊ नये म्हणून स्मार्ट कार्ड योजनेला नोंदणीकरण व वितरणासाठी एसटी महामंडळाने ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
एसटी महामंडळाच्या माध्यमातून २९ विविध सामाजिक घटकांना २५ टक्क्यांपासून १०० टक्क्यांपर्यंत प्रवासी भाड्यांमध्ये सवलत दिली जाते. सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीना आधार क्रमांकाशी निगडित स्मार्ट कार्ड काढण्याची योजना सुरू करण्यात आली. त्यानुसार एसटीच्या प्रत्येक आगारामध्ये ज्येष्ठ नागरिक व अन्य सवलत धारकांना स्मार्ट कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, कोरोनाचा संसर्ग तसेच एसटीच्या संपामुळे प्रवाशांना आगारात येऊन स्मार्ट कार्डासाठी नोंदणी करणे किंवा स्मार्ट कार्ड घेणे शक्य झाले नाही.
आषाढी एकादशीनिमित्त ज्येष्ठ नागरिकांना प्रवासात गैरसोय होऊ नये म्हणून त्यांच्या मागणीनुसार जुलैमध्ये योजनेला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र आता गणेशोत्सव तसेच दिवाळीच्या कालावधीतही ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी ज्येष्ठ नागरिकांचे स्मार्ट कार्ड नोंदणीकरण व वितरण करण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.