निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवल्यानंतर पक्षाच्या नावात शिवसेना नाव वापरण्यासही ठाकरे व शिंदे गटाला मज्जाव केला आहे. यावर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. आता एखादी निवडणूक होऊ दे म्हणजे दुध का दुध पानी का पानी होईल, मतदार कुणाच्या बाजुला आहेत हे स्पष्ट होईल. असा टोला अजित पवारांनी भाजप व शिंदे गटाला लगावला आहे. ते बारामतीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
अजित पवार म्हणाले की, निवडणूक आयोगाकडून असा निर्णय अपेक्षित नव्हता. यातून स्पष्ट होतो की, लोकशाहीच सध्या अडचणीत आणलेली आहे. आता फक्त एक निवडणूक होऊ दे म्हणजे दुध का दुध पानी का पानी होईल. मतदार कुणाच्या बाजुला आहेत हे लवकरच भाजप व शिंदे गटाला समजेल. असा टोला अजित पवारांनी लगावला आहे.
दसऱ्यासारख्या दिवशी काय राजकारण झालं हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलं आहे. आयोगाचे मागचे काही निकाल पाहता, बैलजोडीच्या वेळी सिंडीकेट-इंडिकेट झालं, त्यावेळी बैलजोडी गोठवून दुसरं चिन्ह दिलं. त्यानंतर गाय वासरु गोठवून पंजा आणि राष्ट्रवादीला घड्याळ ही चिन्ह दिलं. नांगरधारी शेतकरी किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारची चिन्हे असतील. जनसंघाचे पणती चिन्ह होतं. ते जनता पक्षात गेल्यावर नांगरधारी शेतकरी चिन्ह दिलं. नंतर मग कमळ दिलं. अशा घटना मागे झालेल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की, शिवसेना हा पक्षच बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेला पक्ष आहे. परंतु,सर्वोच्च न्यायालयाने तो अधिकार निवडणूक आयोगाला दिला, मात्र निवडणूक आयोगाने असा अनपेक्षित निकाल देवून सर्वांना धक्का दिला आहे असे अजित पवार म्हणाले.
यावेळी बोलतांना अजित पवार पुढे म्हणाले की, राज्यात मध्यावधी निवडणुका लागणार नाहीत. पण आता अंधेरीत पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवार दिलाय. त्यालाच आम्ही पाठिंबा दिला असून काँग्रेसही त्याबद्दल सकारात्मक निर्णय घेईल. मुंबईकर जनताही उद्धव ठाकरेंच्या मागे ठाम आहे, जनताच योग्य निर्णय घेईल. २०१९ मध्ये निवडणुकीच्या वेळेला शिवसेना उमेदवारांचे पोस्टरवर नरेंद्र मोदी यांच्यासह बाळासाहेब ठाकरे यांचाही फोटो होता. ते शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार होते. आता बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो लावून यापुढील निवडणुका होतील.