(मुंबई)
बॉलिवूड अभिनेता जितेंद्र यांची लेक आणि निर्माती एकता कपूरने इतिहास रचला आहे. एकताने नवा विक्रम रचला आहे. टीव्ही ते ओटीटी आणि हिंदी चित्रपटांपर्यंत ती उत्कृष्ट दिग्दर्शक-निर्माती म्हणून ओळखली जाते. एकताने ‘नागिन’सारखे शो केले आणि अनेक अभिनेत्रींचे करिअर सेट केले. यासह आता एकता कपूरने जागतिक स्तरावर भारताचे डोके अभिमानाने उंच केले आहे. एकता कपूरला आंतरराष्ट्रीय एमी डायरेक्टर अॅवॉर्ड मिळाले आहे.
५१ व्या आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार सोहळ्यात जितेंद्र यांच्या मुलीला आंतरराष्ट्रीय एमी डायरेक्टर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा सन्मान मिळवणा-या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत. २० नोव्हेंबर रोजी न्यूयॉर्कमध्ये त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. भारतीय टेलिव्हिजन उद्योगातील योगदान आणि सह-संस्थापक म्हणून बालाजी टेलिफिल्म्स प्रॉडक्शन हाऊसची स्थापना केल्याबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात येणार आहे.
एकता कपूरच्या प्रॉडक्शन हाऊस बालाजी टेलिफिल्म्सबद्दल बोलायचे झाले तर, ते १९९४ मध्ये सुरू झाले होते. आई-वडील जितेंद्र कपूर आणि शोभा कपूर यांच्यासोबत एकताने हे प्रॉडक्शन हाऊस सुरू केले.