(रत्नागिरी)
उवेज अंजुम मक्की या तरुणाच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल होऊन महिना उलटला तरी अद्याप संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली नाही. या बाबत आपण पोलिस ठाण्यासमोर उपोषणास बसू असा इशारा उवेज मक्कीची आई आबिदा मक्की यांनी दिला आहे. उवेजचा घातपात झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. दि. २१ ऑगस्ट २०२२ रोजी रत्नागिरी येथे समुद्रात बुडून उवेजचा मृत्यू झाला होता.
उवेज मक्की याचा घातपात करण्यात आला असे सुरुवातीपासून बोलण्यात येत आहे. २१ ऑगस्ट रोजी उवेज मक्की याला त्याच्या मित्रांनी रत्नागिरी येथील समुद्रात मासेमारीसाठी नेले. याच दरम्यान बोटीची दुर्घटना घडली व उवेज मक्कीचा बुडून मृत्यू झाला, असे सांगण्यात आले. यावर उवेज मक्कीच्या आईने संशय व्यक्त करून उवेज याचा घातपात घडवून आणला असा आरोप करून तपासाची मागणी केली आहे.
या संदर्भात रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात ३३१ / २०२२ नुसार प्रकरण दाखल असून संशयित आरोपींविरुद्ध भा. दं. वि. कलम ३०४(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी अद्याप संशयित आरोपींना पोलिसांनी अटक का केली नाही, असा सवाल उवेज मक्कीच्या नातेवाईकांकडून विचारला जात आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे द्यावा, अशी विनंती जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्याकडे करण्यात आली आहे. संशयित आरोपींविरुद्ध कडक कारवाई न झाल्यास आपण पोलिस ठाण्यासमोर उपोषण करणार असल्याचे आबिदा मक्की यांनी सांगितले.