(मुंबई)
अनेकदा आपल्या ड्रेसिंग सेन्समुळे आणि स्पष्टवक्ते वक्तव्यांमुळे उर्फी जावेद नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी उर्फीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी शुक्रवारी नवीन रंजन गिरी नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी अटकही केली होती.
मात्र, आता पुन्हा एकदा उर्फीला अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी उर्फीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. उर्फी म्हणते की, मला आणखी एक धमकी मिळाली आहे. माझ्या आयुष्याचा आणखी एक दिवस आणि मला आणखी एक दिवस धमकी मिळाली आहे. आजारपणातही मी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी आली आहे.
यापूर्वीही धमकी
गेल्यावेळी नवीन गिरी नावाच्या व्यक्तीने अनेक वेळा उर्फी जावेदला दूरध्वनी, व्हाट्सॲपवर संदेश पाठवून बलात्कार करण्याची, तसेच ठार मारण्याची धमकी दिली होती. त्यात अश्लील भाषेत वापर करण्यात आला होता. याबाबतची माहिती उर्फीने गोरेगाव पोलिसांना दिली. त्यानंतर एका महिला उपनिरीक्षकाच्या तक्रारीवरून शुक्रवारी पोलिसांनी नवीन गिरीविरुद्ध विनयभंगासह अश्लील शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देणे आदी भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी मंगळवारी नवीन गिरीला अटक केली. तपासात भाड्याच्या खोलीच्या पैशांवरून त्यांच्यात वाद झाला होता. याच वादातून त्याने तिचा विनयभंग, अश्लील संभाषण करून बलात्काराची धमकी दिली होती. अटकेनंतर त्याला बुधवारी बोरिवलीतील न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.