(गुहागर)
उमराठ खुर्द गावचे सुपुत्र आणि आंबेकरवाडीतील जेष्ठ नागरिक सोनू महादेव आंबेकर यांचे शनिवार दि. २५.११.२०२३ रोजी दुपारी ४ च्या दरम्याने त्यांच्या राहत्या घरी वृद्धापकाळाने आणि अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांचे वय साधारणतः ८५ च्या पुढेच होते. खुर्द उमराठ आंबेकरवाडीच्या तसेच उमराठ गावाच्या विकास कामांत आणि जडणघडणीत इतर आधारस्तभां बरोबरचे ते एक आधारस्तंभ तसेच सक्रिय सहभाग घेणारे उत्तम मार्गदर्शक होते.
कै. सोनू महादेव आंबेकर हे एक होतकरू शारीरिक श्रम, मेहनत घेणारे, जिद्दी आणि चिकाटीने काम करणारे परखड व स्पष्टपणे बोलणारे सामाजिक कार्यकर्ते होते. शालेय शिक्षण झाल्यावर मुंबईत विलेपार्ले येथे राहत होते. मेहनत करण्याची सवय असल्यामुळे तरुण वयात सुरुवातीला त्यांनी मॅकेनिक म्हणून गॅरेज मध्ये काम केले. गॅरेज मध्ये काम करत असतानाच त्यांचे वडील कै. महादेव बाबाजी आंबेकर, एअर इंडिया कंपनीत एका उच्च पदावर सुपरवायझर म्हणून कार्यरत होते, जे त्यावेळीचे उमराठ खुर्द आंबेकरवाडीचे एक जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि आधारस्तंभ होते त्यांनीच आपला मुलगा सोनू महादेव आंबेकर यांना एअर इंडिया कंपनीत नोकरीला लावले. त्यांची कोणत्याही प्रकारची हलगर्जीपणा न करता प्रामाणिकपणे काम करण्याच्या पद्धतीमुळे ते प्रमोशन घेत शेवटी सिनीयर आॅपरेटर पदावर १९९५ मध्ये सेवानिवृत्त झाले. त्यांचा तरूण वयात अनेक वर्षे अनेक वेळा रक्तदान करण्यात सिंहाचा वाटा होता.
पुढे ते गावी स्थायिक झाल्यावर उमराठ खुर्द आंबेकरवाडीत तसेच उमराठ गावात सामाजिक आणि धार्मिक कार्यात सक्रिय सहभाग घेऊन कार्यरत होते. स्वच्छंदी आनंदी आणि समाधानाने दुर्गम आजारावर मात करत करत कसे जगायचे याचे उत्तम उदाहरण म्हणजे आमचे जाड्या बाबा उर्फ सोनू महादेव आंबेकर. खरं तर त्यांना २६ वर्षे वर्षांपूर्वी पॅरालीसीसचा(अर्धांगवायूचा) जोरदार झटका येऊन डावी बाजू पुर्णत: निकामी झाली होती. हालचाल करणे सुद्धा त्रासाचे झाले होते. या आजारावर मात करत केवल प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर पुन्हा जिद्दीने / नियमित व्यायामा सारख्या अंग मेहनतीने आपल्या स्वतःच्या ताकदीवर आपले उर्वरित आयुष्य अगदी पुर्वी सारखे सहजपणे चालू होते. आजारावर मात करून पुढे कसे जावे हा त्यांच्या कडून घेण्यासारखा आदर्श होता.
मध्यंतरी आंबेकरवाडीच्या गाजलेल्या नमन मंडळात आंबेकरवाडी नमन मंडळातील प्रमुख स्त्रीपात्र करणारे कलाकार गोविंद गोपाळ आंबेकर यांच्या मी डोलकर या गाण्यावर होडीतील नाखवा आणि वगनाट्य रामायण मध्ये झोपाळू कुंभकर्ण म्हणून त्यांनी केलेली छोटीशी भुमिका प्रेक्षकांच्या अजूनही स्मरणात ठेवणारे ते एक कलाकार होते. गावात ते आंबेकर सोनूदा म्हणून सुपरिचित होते.
कै. सोनू महादेव आंबेकर हे उंच धिप्पाड शरीर यष्टीचे, निर्वेसनी, शांत स्वभावाचे आणि परोपकारी वृत्तीचे होते. ते एक हौशी आणि अष्टपैलू मार्गदर्शक होते. गावातील सर्व मंडळींशी अगदी मनमोकळ्यापणे बिनधास्त वागणारे, कधीही कुणावर न रागावणारे, हरहुन्नरी व्यक्तिमत्त्वाचे होते. गावातील सामाजिक आणि धार्मिक कार्यात त्यांचे योगदान फार मोलाचे असायचे.
कै. सोनू महादेव आंबेकर यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलगे भरत, शरद, सुना, मुली आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने नाही म्हटले तरी एक वाडीतील जेष्ठ सदस्य गेल्याने आंबेकरवाडीवर दुखाःचे सावट पसरलेले आहेच. संपूर्ण आंबेकरवाडीच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांवर ओढवलेल्या दुःखात आपण सर्वजण सहभागी आहोतच. त्या दुखाःतून बाहेर येण्यासाठी/ सावरण्यासाठी त्यांच्या कुटूंबिंयाना धैर्य, ताकद आणि शक्ती मिळो तसेच दिवंगत कै. सोनू महादेव आंबेकर यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो हिच सर्वांतर्फे तसेच ग्रामपंचायत उमराठ परिवारातर्फे ईश्वर चरणी प्रार्थना करून ग्रामपंचायत उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.