( खेड / प्रतिनिधी )
भगवान परशुराम पंचक्रोशी शिक्षण मंडळ संचालित न्यू इंग्लिश स्कूल पढे परशुराम म्हणजेच सध्याच्या आर. सी. काळे माध्यमिक विद्यालय पेढेपरशुराम या शाळेचा माजी विद्यार्थी व शिक्षक मेळावा दिनांक 29 जानेवारी 2023 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ” मला पुन्हा एकदा शाळेत जायचंय….धावत जाऊन रोजच्या बाकावर बसायचंय.” या ओढीनं १८ वर्षांनी सर्व माजी विद्यार्थी पुन्हा एकत्र आले.
या मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आलेले सर्व विद्यार्थी पुन्हा एकदा आपल्या शाळेच्या आठवणींमध्ये हरवून गेले. आपल्या बाकावरच्या जुन्या मित्र-मैत्रिणींना भेटल्याचा आनंद प्रत्येकाच्या डोळ्यात दिसत होता. कार्यक्रमाची सुरुवात यथोचित दीप प्रज्वलन व सरस्वती मातेच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. त्यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रगीत आणि संपूर्ण शालेय परिपाठ घेऊन संपूर्ण शाळेचे संस्कार आजही आम्ही विसरलो नसल्याचे विद्यार्थ्यांनी दाखवून दिले. विद्यार्थ्यांच्या विनंतीला मान देऊन सर्व आजी-माजी शिक्षक वा शिक्षकेत्तर कर्मचारी या सोहळ्याला आनंदाने उपस्थित होते. शिक्षकांचे आगमन यथोचित स्वागत, आणि सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेचा माजी मुख्याध्यापिका केतकर मॅडम माजी मुख्याध्यापक नागणे सर, माजी मुख्याध्यापक कदम सर, माजी पर्यवेक्षक पाटील सर, माजी मुख्याध्यापिका नामजोशी मॅडम, माजी शिक्षिका तावडे, जोशी, तसेच विद्यमान मुख्याध्यापक शिंदे सर, पर्यवेक्षक माळी, सावर्डेकर सर, सावर्डेकर मॅडम माळी मॅडम, दौंडे मॅडम, पिसे मॅडम, पाटणकर सर कदम सर, माळी काका गोरे काका हे सर्व आवर्जून उपस्थित होते.
यावेळी शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांविषयीच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच भविष्यातील आपली कर्तव्य आणि जबाबदारी याविषयीही जाणीव करून दिली. विद्यार्थी आणि सर्व शिक्षकांसाठीही हा भावूक क्षण होता.
सर्व विद्यार्थ्यांनी आपली नवीन ओळख व परिचय दिला. हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी महेंद्र मयेकर, अमोल राऊत अश्विन बाईत निलेश मालवणकर तेजश्री पाकळे मीनल बारे यांनी विशेष मेहनत घेतली. या संपूर्ण सोहळ्याचे सूत्रसंचालन सुमित बोरले, स्वप्निल गमरे व प्रतिभा शिंदे यांनी केले. यानंतर स्नेहभोजनाचा आस्वाद शिक्षक आणि विद्यार्थी यांनी घेतला. अशाच मेळाव्याच्या निमित्ताने प्रत्येक वर्षी भेटण्याचा संकल्प करून या कार्यक्रमाची सांगता झाली आणि अत्यंत भावूक आठवणी सोबत घेऊन पुन्हा प्रत्येकाची पावले आपापल्या कर्तव्य ठिकाणी वळाली.