(मुंबई)
मुंबई उच्च न्यायालयातील ॲड. मिलिंद मनोहर साठये आणि औरंगाबाद खंडपीठातील ॲड. संतोष चपळगावकर यांची मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तशी अधिसुचना केंद्रीय कायदे मंत्री किरण रिजीजू यांनी ट्विटवरून केली आहे. त्यांच्या न्यायमूर्तींच्या नियुक्तीमुळे मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्तींची संख्या आता ६८ झाली आहे.
भारताचे माजी मुख्य सरन्यायाधीश उदय ललित यांच्या नेतृत्वाखालील सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने या वर्षी १२ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत या दोन वकिलांना मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून बढती देण्याची शिफारस केली होती. तर सर्वोच्च न्यायालयाने २६ सप्टेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्या. दीपांकर दत्ता यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्याची शिफारसही केली होती. मात्र केंद्र सरकारकडून साठये आणि चपळगावकर यांच्या नियुक्तीला मंजूरी मिळाली असली तरी अद्यापही मुख्य न्या. दत्ता यांच्या नियुक्तीला हिरवा कंदील मिळालेला नाही.