(रत्नागिरी)
उक्षी येथील कातळशिल्प राज्य संरक्षित म्हणून घोषित करण्यात आले आहे. यापूर्वी बारसू येथील कातळशिल्प समूह क्र. २, चवे, देवीहसोळ आणि कशेळी ही कातळ शिल्प राज्य संरक्षित स्मारके म्हणून घोषित करण्यात आली आहे. युनेस्कोच्या प्रस्तावित यादीत कातळशिल्प समाविष्ट होत असताना शासनाने राज्य संरक्षित स्मारकाची घोषणा केल्यामुळे त्यांना पाठबळ मिळणार आहे.
उक्षी येथील कातळ खोदचित्राला राज्य शासनाने राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. याबाबतची अधिसूचना मंगळवार (ता. ३०) जारी झाली आहे. कोकणातील प्रागैतिहासिक विशेषत्त्वाने मध्याश्मयुगीन मानवाने निर्माण केलेली कलाकृती म्हणून उक्षी येथील कातळशिल्पाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. उक्षी हे मध्याश्मयुगीन काळातील असून या कातळशिल्पावर हत्ती दाखविण्यात आला आहे. संरक्षित करण्यात आलेल्या कातळशिल्पासह सभोवताली आसलेल्या ६६०.४० चौरस मीटर जागा संरक्षित करण्यात येणार आहे.
कोकणात अश्मयुगीन संस्कृतीचे वैशिष्टयपूर्ण वेगळेपण अधोरेखित करणारी कातळ खोदचित्रे आहेत. कोकणात आढळून येत व असलेली कातळशिल्प हो जांभ्या दगडांनी युक्त उघड्या कातळ सड्याच्या पृष्ठभागावर कोरलेली आहेत. ही शिल्प एका विशिष्ट जागेत न आढळता समुद्रकिनाऱ्यालगत सुमारे ३०० किलोमीटर अंतरावर विविध ठिकाणी आढळून येतात.
गेल्या १३ वर्षांपासून रत्नागिरीत सुधीर तथा भाई रिसबूड, धनंजय मराठे आणि डॉ. प्रा. सुरेंद्र ठाकुरदेसाई यांच्या टीमने कातळशिल्प शोध, संशोधनाला सुरुवात केली. आतापर्यंत कोकणात १७५ गावांत २ हजारांहून अधिक कातळखोद चित्रे नोंद झाली आहेत. त्यातील १७ गावांतून राज्य संरक्षित स्मारक होण्याकरिता प्रस्ताव शासनाकडे पाठवले आहेत. हा दर्जा देण्याकरिता प्रक्रिया सुरू झाली आहे.