दापोली तालुक्यातील उंबरशेत येथील बंद घर अज्ञात चोरट्याने फोडून आतील सुमारे २ लाख ७५ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना १३ मे रोजी उघडकीस आली आहे. सुनील सोनू गोरीवले हे आपल्या परिवाराला घेऊन १२ मे रोजी सायंकाळी ५ वा. च्या सुमारास मंदिवली या गावी गेले होते. ते दुसऱ्या दिवशी घरी पोहोचले असता त्यांना आपल्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडलेले दिसले.
त्यांनी घराची पाहणी केली असता कपाटातील ५० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन, ३० हजार किमतीचा नेकलेस, ६५ हजार व ५० हजार रुपये किमतीचे दोन मंगळसूत्र, ६ हजार ६०० रु. किमतीची अंगठी व रोख रक्कम ७० हजार असा एकूण २ लाख ७५ हजार किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. गोरीवले यांनी दापोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक निनाद कांबळे हे करीत आहेत