(रायगड)
जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी दरड दुर्घटनेतील मृतांचा आकडा २९ झाला आहे. रविवारी सलग चौथ्या दिवशी एनडीआरएफकडून शोधमोहीम राबवण्यात आली. शोधमोहिमेत सापडलेल्या मृतदेहांची स्थिती पाहूनआजपासून शोध मोहीम थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली
उदय सामंत म्हणाले की, आतापर्यंत २७ मृतदेह सापडलेले आहेत. मृतदेहांची अवस्था खूपच वाईट आहे. संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे सोमवारपासून शोधमोहीम थांबवण्यात येणार असून, बेपत्ता लोकांना मृत घोषित करण्यात येईल.
शासनाच्या नोंदीनूसार, इर्शाळवाडीत ४३ कुटूंबातील २२९ सदस्य होते. त्यातील १२४ जण सुखरुप बचावले आहेत, २९ ग्रामस्थांचे मृतदेह सापडले आहेत, तर ७८ अद्याप बेपत्ता आहेत. दरम्यान या दुर्घटनेतील २२ जखमी ग्रामस्थांपैकी १८ ग्रामस्थांना उपचार करून सोडण्यात आले आहे. तर ४ जण अद्याप रुग्णालयात उपचार घेत आहेत. यापैकी एक ग्रामीण रुग्णालय चौक येथे तर अन्य तिघे एम. जी. एम. रुग्णालय नवी मुंबई येथे उपचार घेत आहेत. असेही उदय सामंतांनी सांगितले.
दरम्यान, दुर्घटनेनंतर विविध पथके तेथे कसून मदत व बचावकार्य करीत असताना मदतीसाठी न बोलावता गडावर येणारे नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, ट्रेकर्सचा त्रास पथकांना होऊ लागला आहे. बचतकार्यातील हे अडथळे लक्षात घेऊन मदतकार्यात नेमलेल्या व्यक्तींशिवाय इतरांना गडावर जाण्यास रविवारपासून पुढील पंधरा दिवस १४४ कलमाद्वारे बंदी घोषित केली आहे. कर्जतचे उपविभागीय अधिकारी अजित नैराळे यांनी शनिवारी हे विशेष आदेश लागू केले आहेत. २३ जुलै ते ६ ऑगस्टपर्यंत हे आदेश लागू असणार आहेत.
या दुर्घटनेतून बचावलेल्या रहिवाशांचे तात्पुरते आणि कायमस्वरूपी पुनर्वसन अशा दोन टप्प्यांत व्यवस्था करण्यात येणार आहे. यामध्ये, तात्पुरत्या स्वरूपातील पुनर्वसन म्हणून कंटेनरमध्ये असून त्यांच्यासाठी आवश्यक कपडे, धान्य यांची व्यवस्था करण्यात आली आहे. दरडग्रस्त १४१ रहिवाशांचे तात्पुरते पुनर्वसन चौक येथील डायमंड पेट्रोलपंप येथे कंटेनरमध्ये करण्यात आले आहे. तसेच, या पीडितांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी मुख्यमंत्र्यांनी सिडकोशी चर्चा करून निर्णय घेतला आहे. त्यासाठी जागेची निश्चिती करण्यात आली असल्याचे रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.