सध्या सोशल मीडियावर रिल्स बनवण्याची फॅशन आली आहे. रिल्स बनवून रातोरात स्टार झालेले अनेक लोकआहेत. याच्या माध्यमातून लोकांनी कमाईचे साधनही शोधले आहे. मात्र एका महिला बस कंडक्टरला इन्स्टाग्रामवर रिल्स (व्हिडिओ) बनवणे चांगलेच महागात पडले आहे. व्हिडीओ बनवल्यामुळे महिला बस कंडक्टरला सेवेतून निलंबित करण्यात आलं आहे. निलंबनाची कारवाई झालेल्या या महिला कंडक्टरची सध्या जोरदार चर्चा आहे.
ड्युटीवर असताना रिल्स बनवून इन्स्टाग्रामवर अपलोड केल्यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेतून निलंबित केलेली महिला उस्मानाबाद जिल्ह्यातील आहे. मंगल सागर गिरी असे निलंबित करण्यात आलेल्या महिला कंडक्टरचे नाव आहे. गिरी या उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब एसटी आगारात कार्यरत आहेत. सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड करून एसटी महामंडळाची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका मंगल गिरीया महिला बस वाहकावर ठेवण्यात आला आहे. या वाहकाबरोबरच महामंडळाने वाहतूक नियंत्रकालाही सेवेतून निलंबित केलं आहे. कल्याण कुंभार असं निलंबित वाहतूक नियंत्रकाचे नाव आहे.
मंगल गिरी या निलंबित महिला वाहकाचे इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत. गिरी या बॉलिवूड व मराठी गाण्यांवर रिल्स बनवून इन्स्टावर अपलोड करत होत्या. गिरी यांचे अनेकव्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र गिरी यांनी एसटी महामंडळाचा गणवेश परिधान करून तुळजाभवानी देवीच्या गाण्यावर व्हिडीओ करून तो इन्स्टाग्रामवर अपलोड केला. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड वायरल झाला आहे. यांच्या निलंबनाचे हेच कारण ठरले.एस टी महामंडळाची प्रतिमा मलीन केल्याचा आरोप करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.