रत्नागिरी : जागतिक पर्यटन दिनानिमित्त इन्फिगो आय केअर हॉस्पिटल आणि रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्था आयोजित फोटोग्राफी स्पर्धेत प्रदीप कोळेकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तर द्वितीय क्रमांक जगदीश पवार तृतीय क्रमांक साहिल मुक्री यांनी मिळवला. या स्पर्धेत उत्तेजनार्थ ओम पाडाळकर, निरामय साळवी आणि लतिकेश घाडी यांनी मिळवला. या स्पर्धेचे बक्षीस वितरण आज (ता. २७) व्यंकटेश एक्झिक्यूटीव्हमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
पर्यटन दिनाच्या पूर्वसंध्येला स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. पर्यटन सहकारी सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजू भाटलेकर यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.
भारतीय स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष व जागतिक पर्यटन दिनाचे दुग्धशर्करा योगाचे औचित्य साधताना रत्नागिरी जिल्ह्यातील अस्सल कोकण परिचित होण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले होते. रत्नागिरी जिल्ह्यातील परिचित, अपरिचित आणि अप्रकाशित पर्यटन स्थळांचा शोध व्हावा आणि जास्तीत जास्त पर्यटकांपर्यंत ती स्थळे पोहोचावीत, असा स्पर्धेचा हेतू होता.
या स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील निसर्ग पर्यटन, धार्मिक पर्यटन, वर्षा पर्यटन, निसर्गरम्य दृश्य, नद्या, तलाव, प्राणीजीवन, गिर्यारोहण, ऐतिहासिक स्थळे, लेणी, गड, किल्ले आणि छायाचित्रे आली. विजेत्या स्पर्धकांना केंद्र शासनाच्या पर्यटन मंत्रालयाकडून प्रमाणपत्र, टी-शर्ट दिला जाणार आहे. पहिल्या तीन क्रमांकांना अनुक्रमे पाच हजार रुपये, तीन हजार रुपये, दोन हजार रुपये आणि उत्तेजनार्थ पहिल्या तीन क्रमांकांना प्रत्येकी एक हजार रुपये अशी रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. या स्पर्धेसाठी सुधीर रिसबूड, अजय बाष्टे यांच्यासह अनेकांचे सहकार्य लाभले.