(जैतापूर/राजन लाड)
भारताच्या स्वातंत्र्यानंतर पंच्याहत्तर वर्षे उलटून देखील राजापूर तालुक्यातील मठवाडी येथील गिरी गोसावी समाजाची मरणोत्तर परवड काही संपलेली नाही.
येथे मरणानंतर पार्थिव नेण्यासाठी काटेकुटे चिखल, दलदल आणि पाण्यातून वाट काढत स्मशानभूमी पर्यंत पोहोचावे लागते. राजापूर तालुक्यातील दळे मठवाडी येथे सुमारे शंभर ते दीडशे गिरी गोसावी समाज वस्ती आहे. या समाजात लोकांना मरणानंतर दफन करण्याची प्रथा आहे. या समाजासाठी दफनभूमी जैतापूर खाडी पात्रांमध्ये आहे. सुमारे 14 गुंठे जागेच्या सभोवताली खाडीचे पाणी आणि चिखल, दलदल असते. 14 गुंठे असलेली ही जागा खाडीच्या पाण्याने धूप होऊन केवळ अर्धा गुंठा शिल्लक राहीली आहे.
खेदाची गोष्ट अशी की या समाजातील कोणी मयत झाल्यास भरती ओहोटी पाहून प्रेत न्यावे लागते. भरतीचे पाणी नसेल तेव्हाही चिखल, कांदळवन, काटे कुटे पालथे घालत कष्टाने पार्थिव न्यावे लागते.
लोकप्रतिनिधीनी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. शासन दरबारी अनेक वर्षांपासून अर्ज विनंत्या करूनही काहीच मदत झालेली नाही. तांत्रिक मुद्दे पुढे करून या दफनभूमीकडे दुर्लक्ष केले जात आहे.
गिरी गोसावी समाजाची ही परिस्थिती सर्वच लोकप्रतिनिधींना माहीत आहे. मात्र त्यावर अद्याप तोडगा काढण्यात आलेला नाही. देहाची मरणोत्तर हेळसांड, परवड होत असेल तर स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही अशी दुर्दशा असणे भूषणावह नक्कीच नाही. सध्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर ही घटना शासनाच्या डोळ्यात अंजन घालणारी ठरणार आहे. या घटनेने आपण खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय का? असा प्रश्न गिरी समाजाला पडला आहे.
शासनाने याकडे वेळीच लक्ष देऊन गिरी समाजाची होणारी परवड थांबवावी आणि त्यांना न्याय मिळवून द्यावा. तरच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव खऱ्या अर्थाने साजरा झाल्याचा आनंद होईल.