(सुमात्रा)
इंडोनेशियातील “मरापी ज्वालामुखी”चा रविवारी झालेल्या उद्रेकानंतर ११ गिर्यारोहकांचा मृत्यू झाला. ९,८४३ फूट उंचीचा हा ज्वालामुखी सातत्याने आग आणि राख ओकत आहे. या ज्वालामुखीजवळ जाऊ नये, असा इशारा इंडोनेशियाच्या आपत्ती व्यवस्थापनाने दिला आहे.
ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर यातून वेगाने राख उसळत असल्याचे दिसून आले. यामुळे आजूबाजूच्या शहरांतील रस्ते, घर, वृक्ष आणि वाहनांवर राखेचे थर जमा झाले. ज्वालामुखीच्या तीन किमी परिसरात जाऊ नये, असा इशारा प्रशासनाने नागरिकांना दिला आहे. मरापी ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर दुसऱ्या पातळीचा सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला.
आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्ही स्थानिकांना मुखाच्छादन दिले आहे. विषारी राखेच्या संपर्कात येऊ नये म्हणून लोकांना घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आला. जगभरात १,५०० सक्रिय ज्वालामुखी आहेत. जगातील सर्वांत जास्त सक्रिय ज्वालामुखी इंडोनेशियात आहेत. येथे एकूण १२१ ज्वालामुखी आहेत. त्यापैकी ७४ १८०० पासून सक्रिय आहेत. त्यापैकी ५८ ज्वालामुखी १९५० पासून सक्रिय आहेत. म्हणजे यांचा कधीही उद्रेक होऊ शकतो. सात ज्वालामुखींचा उद्रेक १२ ऑगस्ट २०२२ पासून सुरू आहे. क्राकटाऊ, मेरापी, लेवोटोलोक, कारांगेटांग, सेमेरू, इबू आणि डुकोनो येथे हे ज्वालामुखी आहेत.