पाऊस
आला काळोख दाटून
नक्षी बिजलीची नाचे
आला पाऊस भरून…
अंगणात विखुरले
टपोरले पाणमोती
स्पर्श आईचा होऊनी
लाल चमकली माती…
झाड झाड तरारले
डूल पानांचे लेवून
सकाळच दिव्य भासे
फांदी नमते वाकून…
पाणी उरात भरून
खळाळती नदी नाले
थव्या थव्याने फिरती
आनंदती जीव ओले
सुखावला बळीराजा
पिक जोमात बघून
कृपा सदोदित राहो
दारा हिरवे तोरण!
अंजली विवेक मुतालिक, कुडाळ.
मोबाईल 9420306408
आला आषाढ आषाढ
नभी मेघांचीही दाटी
बरसता सरीवर सरी
सय येई माहेराची
आला आषाढ आषाढ
झाली पेरणी लावणी
विसावला बळीराजा
आठवू लागे विठूमाऊली
आला आषाढ आषाढ
पायी चालली ग वारी
हरीनामे गजरात
दुमदुमली पंढरी
आला आषाढ आषाढ
चहूबाजू पाणी दाटे
जीव शिवाशी ग भेटे
आनंदची आनंद चहूदिशी ग कोंदे
आला आषाढ आषाढ
झाडे पाने फुलारली
श्रावणाच्या स्वागताची
जणू सिद्धता जाहली
-©सौ.मीनल अमित ओक
बघ किती हा पाऊस
तीच प्रेमाची चाहूल !
पुन्हा तुझ्या वाटेवर
माझे अडते पाऊल !!
तीच संध्याकाळ आहे
तोच आहे हा पाऊस !
ते विनवणीचे बोल
थांब ! नको ना जाऊस !!
ठोका काळजाचा चुके
लागे गोड हुरहूर !
तुझ्या समीप येण्याला
आहे हृदय अधीर !!
बघ कसा थांबला हा
खोटा खट्याळ पाऊस !
तरी तुझे विनावणे
थांब ! नको ना जाऊस !!
घरी वाट बघतील
माझा रोजचा बहाणा !
तुझ्या आर्जवाने सुचे
मनी सुखाचा उखाणा !!
पुन्हा सर पावसाची
किती जीवघेणा खेळ !
नको येऊ तू जवळ
नाही ; ही नाही ती वेळ !!
एक बैठक घेऊया
तू मी आणि तो पाऊस !
मग थांबेल आर्जव
थांब ! नको ना जाऊस !!
ऋतुजा कुलकर्णी
आषाढ
कृष्ण कुट्ट काळे
जलप्रपात हे मेघातले
धबधबा कोसळले..
कृष्ण जलदास
या विद्युल्लतेची किनार
सर्वत्र पाचूचा भास
परिसर हिरवागार ..
व्रतवैक्यल्याचा महिना
येई मृद्मान्य राक्षस
लपावे लागले त्रिदेवांना
भीती वाटली हो त्यांस …
कुमारी रूपे प्रगटली
आषाढी एकादस
सर्वजण उपाशी राहिली
केला दैत्याचा हो हास ..
व्यास नी गुरु पौर्णिमा
करू सारे गुरु वंदना
पुजू गाऊ महिमा
मिळवू अशिर्वचना
आली आषाढी अवस
दीप पूजनाची
अंधार दूर होई खास
मिळे दिशा प्रकाशाची
ग्रीष्म ऋतू संपुनी
आली वर्षा मुरडत
आषाढास निरोप देऊनी
श्रावण येई सुगंध शिंपीत …
सौ. लता जोशी , रत्नागिरी